तोतया पोलिसाकडून तरुणाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 02:56 AM2019-04-02T02:56:46+5:302019-04-02T02:56:59+5:30
एकाला अटक : पाषाण टेकडीवर गेला होता फिरायला
पुणे : पोलीस असल्याचे सांगत पाषाण टेकडीवर फिरायला गेलेल्या तरुणाला पोलीस ठाण्यात घेऊन जातो, असे सांगून लुबाडणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे़
राहुल सर्जेराव पवार (वय २६, रा़ शिवतेजनगर, हिंजवडी) असे त्याचे नाव आहे़ ही घटना सुसखिंडीजवळील पाषाण टेकडीवर शनिवारी रात्री साडेसात वाजता घडली़ याप्रकरणी एका २५ वर्षांच्या तरुणाने फिर्याद दिली आहे़ हा तरुण आपल्या मैत्रिणीसमवेत पाषाण टेकडीवर फिरायला गेला होता़ या वेळी राहुल पवार याने त्यांना या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी हाफ मर्डर झाला आहे़ मी पोलीस आहे़ या ठिकाणी मुला- मुलींना फिरायला बंद आहे़ तरी देखील तुम्ही येथे फिरता, आता मी तुम्हाला पोलीस स्टेशनलाच घेऊन जातो, अशी धमकी दिली़ त्यानंतर त्याने तरुणाकडे ५ हजार रुपयांची मागणी केली़ व त्यांच्याकडील ५०० रुपये जबरदस्तीने लुटून नेले़ याची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन पवार याला अटक केली आहे़ दोन दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने एका तरुणाला दोघांनी जबरदस्तीने लुबाडले होते़
महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ६ लाखांना गंडा
पुणे : मुलाला महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका महिलेला ६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी वडगाव बुद्रक येथील ५८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे़ ही घटना १८ मार्चपासून आतापर्यंत वडगाव बुद्रक येथे घडली. या महिलेला दोघांनी विश्वास संपादन करुन महापालिकेत त्यांच्या मुलांना क्लार्कपदावर नोकरी लावतो, असे सांगितले़ त्यासाठी त्यांच्याकडून ६ लाख रुपये १८ मार्च रोजी घेतले़ त्यानंतर नोकरीबाबत विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़
निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांची ३२ लाखांची फसवणूक
पुणे : रो-हाऊस बांधून देण्याच्या नावाखाली एका निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांची ३२ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे़ याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे़
बाबाजी बाबूराव जाधव (रा़ सद्गुरु बंगला, धनकवडी) असे त्यांचे नाव आहे़ याप्रकरणी प्रकाश मॅमन जार्ज (वय ६३, रा़ घाटकोपर) यांनी फिर्याद दिली आहे़ हा प्रकार ८ जानेवारी २०११ पासून घडला आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रकाश जॉर्ज हे मुंबई येथून सहायक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत़ जाधव यांनी त्यांना कात्रज येथील गायत्री बिल्ंिडग येथे रो हाऊस बांधून देतो, असे सांगितले होते़ त्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ३२ लाख रुपये घेतले़ मात्र, गेल्या ८ वर्षात रो-हाऊस बांधून दिला नाही़ जार्ज यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला
आहे़