उपचाराच्या बहाण्याने चक्क हॉस्पिटलवरच दरोडा; इंजेक्शन, गोळ्यांसहित ८ हजार चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 03:30 PM2021-07-25T15:30:29+5:302021-07-25T15:30:36+5:30
उंड्री येथील इंडस हॉस्पिटलमध्ये २२ जुलैला मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली
पुणे : 'पायाला जखम झाली असून तिच्यावर उपचार करा', असा बहाणा करुन हॉस्पिटलमध्ये शिरलेल्या चौघांनी कंपाउंडरला मारहाण करुन काऊंटरमधील ८ हजार रुपये तसेच इंजेक्शन, गोळ्या घेऊन दरोडा टाकून पळून गेले. ही घटना उंड्री येथील इंडस हॉस्पिटलमध्ये २२ जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी एका २४ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे इंडस हॉस्पिटलमध्ये कंपाउंडर म्हणून नोकरी करतात. ते २२ जुलैला रात्रपाळीला असताना मोटारसायकलवरुन चौघे जण आले. आरोपींनी त्यांच्याकडे येऊन आमच्या पायाला जखम झाली आहे. त्यावर काहीतरी उपचार करा, असे सांगितले.
उपचार करण्यासाठी तरुण साहित्य शोधू लागले असताना आरोपींनी हॉस्पिटलमधील मेडिकलच्या काऊंटरमध्ये असलेले ८ हजार रुपये तसेच तेथील इंजेक्शन व औषधे असा १३ हजार रुपयांचा माल जबरदस्तीने काढून घेतला. तरुण यांनी त्याला विरोध केला असता त्यांच्यातील एकाने फिर्यादी यांच्या डोक्यात खुर्ची फेकून तसेच लोखंडी पाईपाने मारहाण करुन जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक आर. एस. मोहिते अधिक तपास करीत आहेत.