प्रशासन हतबल...! महापालिकेच्या वाहनतळांवर अजूनही लूट सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:36 IST2025-02-27T10:35:06+5:302025-02-27T10:36:22+5:30
- वाहनचालकांकडून मनमानी पद्धतीने शुल्क वसुली

प्रशासन हतबल...! महापालिकेच्या वाहनतळांवर अजूनही लूट सुरूच
- हिरा सरवदे
पुणे : महापालिकेच्या मंडई परिसरातील वाहनतळांवर प्रशासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क वसुली होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मागील आठवड्यात प्रसिद्ध केले. याची दखल घेऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वाहनतळांची पाहणी केली. मात्र, अधिकाऱ्यांची पाठ फिरताच या वाहनतळांवर पुन्हा लूट सुरू झाली आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर ते काहीच बोलले नाहीत. त्यामुळे ठेकेदारांपुढे महापालिकेचे अधिकारी हतबल झाल्याचे सिद्ध होत आहे.
महापालिकेने नागरिकांसाठी शहरात ३० वाहनतळ उभारले आहेत. हे वाहनतळ निविदा काढून ठेकेदारांना चालविण्यासाठी दिले आहेत. नागरिकांच्या गर्दीनुसार ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा झोनमध्ये वाहनतळांची वर्गवारी केली आहे. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मंडई परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. तसेच या परिसरात अनेक महत्त्वाची गणेश मंदिरे आहेत. बाजारपेठ व मंदिरांमध्ये येणाऱ्या नागरिकांची वाहने पार्किंग करण्यासाठी महापालिकेने मंडई परिसरात सतीशशेठ धोंडिबा मिसाळ वाहनतळ, हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ आणि लक्ष्मी रस्ता परिसरात शिवाजीराव कृष्णाराव आढाव (हमालवाडा) वाहनतळ अशी वाहनतळांची उभारणी केली आहे.
हे वाहनतळ ‘झोन-क’मध्ये मोडत असल्याने महापालिकेने येथील शुल्क दुचाकीसाठी ३ रुपये आणि चारचाकीसाठी १४ रुपये असे निश्चित केले आहे. मात्र, येथील ठेकेदार वाहनचालकांकडून प्रतितास चार ते पाचपट शुल्क उकळत होते. महापालिकेने निश्चित केलेल्या शुल्काचा उल्लेख असणारा फलक दर्शनी भागात लावण्याचे बंधन असतानाही दरफलक दिसत नव्हते. शिवाय कोणालाही शुल्क घेतल्यानंतर पावती दिली जात नव्हती.
यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वाहनतळांची पाहणी केली. यावेळी गायब असलेले दरपत्रक झळकले पाहायला मिळाले. तसेच त्यांनी नेलेल्या पिवळ्या नंबरप्लेटच्या चारचाकी गाडीला नियमानुसार शुल्क आकारून चालकाला पावतीही दिली.
मात्र, अधिकाऱ्यांची पाठ फिरताच संबंधित ठेकेदारांकडून पुन्हा वहानचालकांची लूट सुरू झाली. लोकमत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीमध्ये मिसाळ वहानतळात कुठेही शुल्काचा फलक दिसला नाही. स्वच्छतेचे फ्लेक्स मात्र जागोजागी दिसतात. या ठिकाणी आजही वाहनचालकांकडून निघेल तेव्हढे पार्किंग शुल्क वसूल केले जाते. या ठिकाणी मंगळवारी तीन ते चारच्या सुमारास एका दुचाकीला नियमानुसार तीन रुपये एका तासाला घेतले. तर दुसऱ्या एका दुचाकीला दोन तासांसाठी वीस रुपये घेतले. तर एका चारचाकीसाठी दोन तासांसाठी शंभर रुपये घेतले. तर दुसऱ्या एका चारचाकीला दीड तासासाठी ८० रुपये घेतले.
तसेच बाबू गेणू पार्किंगमध्ये एका ठिकाणी महापालिकेचा शुल्कासंबंधी फ्लेक्स आहे. एका काॅलमवरही शुल्क लिहिलेले आहे. तरीही वाहनचालकांकडून जास्तीचे शुल्क घेतले जाते. या ठिकाणी मंगळवारी चारच्या सुुमारास जास्तीचे महापालिकेच्या दरानुसार शुल्क घेण्यावरून दोन दुचाकीचालकांनी विचारणा केली. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी त्या दुचाकीस्वारांसोबत वाद घातले. गाडी पार्किंग करा म्हणून बोलवायला आलो नव्हतो, मागेल तेवढे पैसे द्यावे लागतील, असे येथील कर्मचारी बोलले. सोबत महिला व इतर लोक असल्याने संबंधितांनी फारसा वाद न घालता दहा रुपये देऊन निघून जाणे पसंद केले. या ठिकाणी चारचाकीसाठीही तासाला ५० रुपयांच्या आसपास शुल्क घेतले जात असल्याचे निदर्शनास आले.
अधिकारी हतबल
वाहनतळांमध्ये अजूनही लूट सुरूच आहे. यासंदर्भात आपण काय कारवाई करणार, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. नंतर बोलतो, असे म्हणत बोलणे टाळले. त्यामुळे अधिकारी ठेकेदारांपुढे हतबल झाल्याचे निदर्शनास आले.