पुणे : ED ने जप्त केलेल्या डी. एस. कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 09:25 AM2021-10-12T09:25:10+5:302021-10-12T09:25:36+5:30
D.S.Kulkarni : डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बंगलाही ED कडून जप्त करण्यात आला होता.
पुणे : हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गेल्या ४ वर्षांपासून बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी हे तुरूंगात आहेत. दरम्यान, त्यांच्या अटकेनंतर सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या डी एस कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाग्यश्री अमित कुलकर्णी (वय ३७, रा. मार्बल आर्च सोसायटी, गणेशखिंड रोड) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
डी. एस कुलकर्णी यांनी चतु:श्रृंगी मंदिराच्या जवळ सुमारे ४० हजार चौरस फुट बांधकाम असलेला सप्तशृंगी हा बंगला २००६ रोजी बांधला आहे. जुन्या पद्धतीने बांधलेला हा बंगला वैशिष्टपूर्ण आहे. डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो बंगलाही सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) जप्त केला आहे. तेव्हापासून तो बंदच आहे. चोरीचा हा प्रकार १६ ऑक्टोबर २०१९ ते ११ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला आहे.
"त्यांच्या कुटुंबावर ईडीने गुन्हा दाखल केला असल्यामुळे तो जप्त केल्याने बंद होता. या बंगल्यामध्ये चोरी झाली असल्याच्या संशयाने फिर्यादी यांनी ईडीचे अधिकारी, पोलीस व पंच यांच्या समक्ष पाहणी केली. बंगल्याचे दरवाजाचे लॉक व सिल कोणीतरी चोरट्याने तोडून बंगल्यामधील ८ एल ई डी टीव्ही, कॉम्प्युटर, ३ सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातील चांदी, कॅमेरा, गिझर, पिठाची गिरणी असा एकूण ६ लाख ९५ हजार रुपयांचा माल चोरुन नेला," असे भाग्यश्री कुलकर्णी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.