पुण्यातील प्रसिद्ध नातूबाग गणपती मंदिरात दानपेटीची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 04:46 PM2019-07-31T16:46:34+5:302019-07-31T16:48:29+5:30
पुण्याच्या गणेशोत्सव साऊंड व लाइटिंगचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाजीराव रस्त्यावरील प्रसिद्ध नातूबाग गणपती मंदिरात चोरीची घटना घडली आहे.
पुणे : पुण्याच्या गणेशोत्सव साऊंड व लाइटिंगचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाजीराव रस्त्यावरील प्रसिद्ध नातूबाग गणपती मंदिरातचोरीची घटना घडली आहे. यावेळी चोरट्यांनी दानपेटीच लंपास केली आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
बाजीराव रस्त्यावरील नातूबाग गणपती मंडळाच्या मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटी लंपास केली. सकाळी मंडळाच्या कार्यकर्त्यांना चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. तेथे असलेले सीसीटीव्ही तपासले असता, मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडले. मंदीरात जाऊन दानपेटी उचलून बाहेर आणली. त्यानंतर दुचाकीवर बसून पळून गेले. या दानपेटीमध्ये साधारणपणे १० हजार रुपयांची रोकड असावीयाप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
गेल्या एका वर्षापासून ही दानपेटी उघडलेली नव्हती. श्रावण महिना सुरू झाला की ही दानपेटी उघडली जाते, त्यात जमा झालेली रक्कम गणेशोत्सवात वापरली जाते, पण यावेळी चोरट्यांनी आम्हाला दानपेटी उघडण्याची संधी दिली नाही, असे मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी सांगितले.