कर्मयोगी माजी संचालकांच्या वालचंदनगरमधील घरावर दरोडा; दीड लाख अन् सोने, चांदी लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 05:29 PM2021-12-27T17:29:15+5:302021-12-27T18:00:02+5:30
दरोड्यात कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांना मारहाण केल्याने त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले
कळस : वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंथुर्णे व रत्नपुरी भागात दोन घरांवर दरोडेखोरांनी दरोडा टाकून रोख दीड लाख रुपये, साडे चौदा तोळे सोने व चांदीचा ऐवज लंपास केला आहे. या दरोड्यात कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांना मारहाण केली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी रत्नपुरी जवळील गायकवाड वस्ती येथील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या बंगल्याचा दरवाजा कटावणीच्या सहाय्याने तोडून घरामध्ये प्रवेश केला. यावेळी गायकवाड यांच्या पत्नी झोपेतून जाग्या झाल्या. दरोडेखोरांनी त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून कपाटातील सर्व ऐवज देण्यास सांगितले. त्यांनी घाबरून कपाटातील रोख रक्कम दीड लाख, ११ तोळे सोन्याचे दागिने व चांदी असा ऐवज दिला. यावेळी राजेंद्र गायकवाड जागे झाले आणि त्यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र गायकवाड यांना काठीने मारहाण करत त्यांच्या कपाळावर धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत.
त्यानंतर गायकवाड पती-पत्नीला घरात कोंडून वरच्या मजल्यावर जाऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिकार केला यावेळी झालेल्या झटापटीत वरच्या मजल्यावर झोपलेले राजेंद्र यांचे भाऊ राहुल व भावजय वैशाली जागे झाले. राहुल यांनी वरून चोरट्यांना स्टीलची बादली फेकून मारली काही वेळात गायकवाड यांच्या घरात सुरू असलेला गोंधळ ऐकून आजूबाजूचे लोक जागे झाले. इतर नागरिक जागे झाल्याचे पाहून चोरट्यांनी ताब्यात असलेला ऐवज घेऊन पळ काढला.
यानंतर चोरट्यांनी गायकवाड वस्तीत दरोडा टाकून पळून जात असतानाच पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अंथूर्णे हद्दीतील वाघवस्ती येथील मल्हारी वाघ यांचा दरवाजा तोडून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व सहा हजार रुपये रोख रकमेची चोरी केली आहे. घटनेची माहिती मिळताच बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली सदर घटनेचा पुढील तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे हे करीत आहेत.