सिटी स्कॅनसाठी पालिकेच्या दवाखान्यातच लूट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:12 AM2021-05-18T04:12:42+5:302021-05-18T04:12:42+5:30
पुणे : कोरोनाकाळात नागरिकांना कमी दरात सिटी स्कॅन करता यावा याकरिता कमला नेहरू रुग्णालयात सुविधा निर्माण करण्यात आली. क्रष्णा ...
पुणे : कोरोनाकाळात नागरिकांना कमी दरात सिटी स्कॅन करता यावा याकरिता कमला नेहरू रुग्णालयात सुविधा निर्माण करण्यात आली. क्रष्णा डायग्नोस्टिक लॅबला हे काम देण्यात आले आहे. परंतु, याठिकाणी नागरिकांची लूट सुरू असून कोरोना रुग्णांच्या एचआरसीटी स्कॅनसाठी अडीच, तर अन्य रुग्णांना तीन हजार रुपये आकारण्यात येत आहेत. वास्तविक पालिकेच्या निविदेनुसार सीजीएसच्या दराप्रमाणे १५०० ते १६०० रुपये शुल्क घेणे अपेक्षित आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी पालिकेने याठिकाणी स्वस्तामध्ये स्कॅन, रक्ताच्या विविध चाचण्या, एक्सरे, काढण्याची सेवा माफक दरामध्ये उपलब्ध केली आहे.
कोरोनामुळे रुग्ण आणि नातेवाईक खर्चाने बेजार झालेले आहेत. रुग्णाच्या छातीच्या एचआरसीटी चाचणीसाठी डॉक्टरांकडून सांगण्यात येते. शहरात सगळीकडे एचआरसीटीसाठी धावपळ होत आहे. क्रष्णा लॅबमध्ये रुग्ण एसआरसीटीसाठी गेल्यावर अडीच हजार रुपये आणि कोरोना नसलेल्या रुग्णाला तीन हजार रुपये आकारण्यात येतात.
पालिकेबरोबर झालेल्या करारानुसार दीड हजार रुपये आकारणे आवश्यक आहे. शहरातील खासगी डायग्नोस्टिक सेंटरप्रमाणे याठिकाणी पैसे उकळण्यात येत आहेत. याविषयी स्थानिक नगरसेवक रवींद्र धंगेकर म्हणाले की, क्रष्णा डायग्नोस्टिक सेंटरला पालिकेने जागा दिली आहे. येथील स्वच्छतेपासून वीजबिलापर्यंतचा खर्च पालिका करते. नागरिकांना माफक दरात सुविधा देने अपेक्षित असताना मोठ्याप्रमाणात पैसे आकारण्यात येत आहेत.
--//
पालिकेबरोबर झालेल्या करारानुसार सीजीएस दराप्रमाणेच पैसे आकारले जाणे अपेक्षित आहे. जर याठिकाणी जास्त पैसे आकारण्यात येत असतील, तर कारवाई करण्यात येईल. याची माहिती घेऊन आवश्यक सूचना केल्या जातील.
डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख