वाघोली येथे मेडिकल चालकाच्या नातेवाईकांकडून लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:10 AM2021-04-12T04:10:20+5:302021-04-12T04:10:20+5:30
आव्हाळवाडी : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार अजूनही थांबलेला नसून वाघोली (ता. हवेली) येथील आयमॅक्स हॉस्पिटलजवळ असणाऱ्या एका मेडिकल ...
आव्हाळवाडी : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार अजूनही थांबलेला नसून वाघोली (ता. हवेली) येथील आयमॅक्स हॉस्पिटलजवळ असणाऱ्या एका मेडिकल चालकाच्या नातेवाइकांकडून इंजेक्शनसाठी प्रत्येकी दोन ते चार हजार रुपयांमध्ये विक्री केली जात आहे. मेडिकल चालकाच्या नातेवाईकाने स्वतः याबाबत कबुली दिली आहे. याबाबत सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड यांनी या मेडिकल चालकाच्या नातेवाईकाला फोन करून मेडिकलमधून कोविडच्या उपचारासाठी उपयोगी असणारे रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या इंजेक्शनसाठी जास्तीचे पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे याची शहानिशा करण्यासाठी संबंधित मेडिकल चालकाच्या नातेवाईकाला याबाबत विचारणा केली असता संबंधित मेडिकल चालकांच्या नातेवाईकांनी हा प्रकार यापुढे करणार नाही, असे सांगितले. मेडिकल चालकांच्या नातेवाईकांसह संबंधित मेडिकलची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड यांनी विभागीय आयुक्त, अन्न औषध प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे केली आहे.
प्रतिक्रिया :
माझ्या पत्नीच्या नावे मेडिकल आहे. या व इतर मेडिकलमधून नागरिकांना २००० ते ३००० जास्त घेऊन रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री केली आहे. यापुढे असे करणार नाही. मला माफ करावे. - मेडिकल चालकाचा नातेवाईक