वाहतुक नियमन करणारा राेबाेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 05:44 PM2019-01-15T17:44:40+5:302019-01-15T17:47:49+5:30
राेबाेटिक्स शिकणाऱ्या लहान मुलांनी राेबाेट तयार केला असून या राेबाेटच्या माध्यमातून वाहतुक नियमन करणे शक्य हाेणार आहे.
पुणे : आजपर्यंत विविध काम करणारे राेबाे आपण पाहिले आहेत. परंतु पुण्यात सहावी ते नववीच्या मुलांनी चक्क वाहतुक नियमन करणारा राेबाे तयार केला आहे. या राबाेचे प्रात्याक्षिक पुणे पाेलीस आयुक्तलयात करण्यात आले. यावेळी पुण्याचे पाेलीस आयुक्त डाॅ. कें. व्यंकटेशम, वाहतुक पाेलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, विद्यार्थी, नागरिक उपस्थित हाेते.
एस पी राेबाेटिक्स या संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या 6 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी हा राेबाेट तयार केला आहे. गेल्या दाेन महिन्यांपासून या राेबाेटवर काम करण्यात येत हाेते. सहा मुलांनी हा राेबाेट तयार केला आहे. हा राेबाेट माेबाईलवर ऑपरेट केला जाताे. या राेबाेट वाहनचालकांना थांबण्याची आणि जाण्याची सुचना करताे. तसेच ताे प्रत्येक काेणात वळू शकताे. सध्या हा राेबाेट प्राथमिक अवस्थेत असून काळानुरुप यात बरेच संशाेधन करण्यात येणार आहे. त्यानंतर हा राेबाेट वाहतूक पाेलिसांच्या मदतीस येणार आहे. या राेबाेटच्या माध्यमातून उन्हात उभं राहून वाहतूक नियमन करण्याची गरज पाेलिसांना भासणार नाही. या राेबाेटच्या माध्यमातून वाहतूक नियमन करता येणे शक्य हाेणार आहे.
याबाबत बाेलताना पाेलीस आयुक्त व्यंकटेशम म्हणाले, या राेबाेटचा वाहतूक पाेलिसांना फायदा हाेणार आहे. या राेबाेटच्या माध्यमातून वाहतूक नियमन करता येणार आहे. त्याचबराेबर काही संदेश वाहनचालकांना द्यायचा असेल तर ताेही देता येणार आहे. ज्या मुलांनी हा राेबाेट तयार केला आहे. त्या मुलांचे मी अभिनंदन करताे. त्यांनी अशाप्रकरेच काम करुन समाजउपयाेगी गाेष्टी तयार कराव्यात. सध्या हा राेबाेट प्राथमिक अवस्थेत असून काळानुरुप यात सुधारणा केल्यास ट्रॅफिक काॅन्स्टेबल ऐवजी या राेबाेटच्या माध्यमातून वाहतूक नियमन करता येईल.