बहुतेक एटीएममध्ये खडखडाटच
By admin | Published: May 8, 2017 03:17 AM2017-05-08T03:17:23+5:302017-05-08T03:17:23+5:30
सहा महिन्यांपूर्वी एक हजार व पाचशेच्या नोटा रद्द केल्यापासून अद्यापपर्यंत या ना त्या कारणाने चलन तुटवडा जाणवत आहे. अनेक
लोकमत न्यूज नेटवर्क
धनकवडी : सहा महिन्यांपूर्वी एक हजार व पाचशेच्या नोटा रद्द केल्यापासून अद्यापपर्यंत या ना त्या कारणाने चलन तुटवडा जाणवत आहे. अनेक वेळा एटीएममधून पैसे मिळेनासे झाले आहेत. एटीएममधून आवश्यकतेनुसार पैसे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
धनकवडी, दत्तनगर, आंबेगाव पठार, बालाजीनगर या ठिकाणी दुपारी एक वाजेपर्यंत केलेल्या पाहणीमध्ये सर्वच बँकांच्या २३ एटीएमपैकी केवळ एकाच बँकेच्या एटीएममध्ये कॅश उपलब्ध होती. सध्या यात्रा, उरुस, लग्नसराई असल्याने जवळ पैसे आवश्यक असताना एटीएममधून तो मिळत नसल्याने नागरिकांत नाराजी आहे. भारती विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्याने मुलांनी नाराजी व्यक्त केली. पैसे काढण्यासाठी एटीएमचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पैसे काढणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने कॅश लवकर संपत आहे.
पैशासाठी पायपीट
आंबेगाव बुद्रुक : येथील अनेक एटीएममध्ये कॅश नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. खात्यात पैसे असतानाही एटीएममधून ते मिळत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. आंबेगाव पठार येथील सहा एटीएमपैकी दोन ते तीन एटीएममध्येच पैसे उपलब्ध असल्याचे दिसून आले आहे. साई सिद्धी चौकातील एटीएममध्ये दुपारपासून पैसे संपल्याने नागरिकांना एटीएम शोधून पैसे काढण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
हाल कमी होईना
हडपसर : मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला सहा महिने पूर्ण झाले, शासनाने आॅनलाइन व्यवहारासाठी अनेक योजना व बक्षिसे जाहीर केली. नागरिकांचे खिसे खाली झाले. मात्र एटीएम व आॅनलाइन व्यवहार नागरिकांसाठी अजूनही सुकर झाले नाहीत. अनेक एटीएम सुरू; पण कॅश नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ६ महिने उलटूनही ही अवस्था असेल तर ही परिस्थिती नेमकी कधी बदलणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे. स्वाइप मशिनवरही मोठ्या प्रमाणात कर लावला जात असल्याने त्रासात अधिक भर पडली आहे. नागरिकांनी नापसंती व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे होताहेत हाल
सहकारनगर : सहकारनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पेन्शनर्स राहतात. त्यांची राष्ट्रीयीकृत बँकेत खाती आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय बँकेची संख्याही मोठी आहे. मात्र नोटाबंदी होऊन सहा महिने लोटले तरी पैशाचा अभावच आहे. अनेक एटीएममध्ये पुरेशी कॅश नसल्याने येथील ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. ज्या ठिकाणी पैसे आहेत, तेथे मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात. अशा वेळी रांगेत उभे राहून पैसे काढणे प्रत्येकालाच प्रकृतीमानानुसार जमेल असे नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच उन्हाच्या चटक्यामुळे तर अधिकच हाल सुरू झाले आहेत.