गुलाबजाम खाल्ल्याने खडकीत विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2016 03:27 AM2016-04-13T03:27:57+5:302016-04-13T03:27:57+5:30
घरी आलेल्या पाहुण्यांसाठी केलेले गुलाबजाम खाल्ल्याने सायंकाळच्या सुमारास १५ जणांना विषबाधा होऊन उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला. यामध्ये तीन ते सात वर्षांची नऊ बालके
खडकी : घरी आलेल्या पाहुण्यांसाठी केलेले गुलाबजाम खाल्ल्याने सायंकाळच्या सुमारास १५ जणांना विषबाधा होऊन उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला. यामध्ये तीन ते सात वर्षांची नऊ बालके, तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. ही घटना खडकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता येथील मेथेर्डिस चर्चसमोरील सर्व्हंट क्वॉर्टर्समध्ये घडली.
येथील फळविक्रेते फैयुब बागवान यांच्या घरी मंगळवारी नातेवाईक आले होते. या निमित्ताने त्यांनी घरी मांसाहार आणि गुलाबजाम बनविले होते. गुलाबजामचा खवा त्यांनी खडकी बाजारातील एका दुकानातून खरेदी केला होता. दुपारी जेवण झाल्यानंतर काही जणांनी गुलाबजाम खाल्ले. त्यांना सायंकाळनंतर उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामध्ये नऊ बालकांसह १५ जणांचा समावेश आहे. या सर्वांना उपचारासाठी कॅन्टोन्मेंटच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले गेले. तेथून सर्वांना पुण्यातील ससून सर्वेपचार रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. नगरसेवक दुर्योधन भापकर आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य अधीक्षक विलास खांदोडे यांनी रुग्णांची चौकशी करुन आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
खडकी परिसरात उघड्यावर, कृत्रिम आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि मिठाई विक्री केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. येथील अनेक दुकाने, स्वीट मार्ट आणि हॉटेलमध्ये हे प्रकार बिनदिक्कतपणे सुरू आहे. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून कारवाई होत नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)
नांदे, ता. मुळशी येथे टिळ्याच्या कार्यक्रमाला गेलेल्या दीडशे जणांना विषबाधा झाली होती. त्यामध्ये देहूगावमध्ये अनेक जणांचा समावेश होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी विषबाधेची घटना घडली आहे. त्यामुळे अन्न औषध प्रशासनाने सतर्क राहण्याची आवश्यकता असून, हे प्रकार रोखणे गरजेचे आहे.