रोहित-अभिमन्यूची शतकी भागीदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:16 AM2021-03-13T04:16:20+5:302021-03-13T04:16:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : व्हिजन क्रिकेट अकादमीच्या वतीने व संतोष मते परिवाराच्या सहकार्याने आयोजित पहिल्या व्हिजन करंडक तीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : व्हिजन क्रिकेट अकादमीच्या वतीने व संतोष मते परिवाराच्या सहकार्याने आयोजित पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या डावात अभिमन्यू चौहान (६७ धावा) व रोहित करंजकर (७४ धावा) यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर २२ यार्डस क्रिकेट अकादमी संघाने व्हिजन क्रिकेट अकादमी संघाविरुद्ध पहिल्या डावात ६४ धावांची भागीदारी घेतली.
व्हिजन स्पोर्ट्स सेंटरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या तीन दिवसीय लढतीच्या सामन्यात दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात २२ यार्डस संघाने ६५ षटकात २९७ धावा केल्या. तत्पूर्वी काल पहिल्या डावात व्हिजन क्रिकेट अकादमी संघाला ७३.१ षटकात सर्वबाद २३३ धावाच करता आल्या. २२ यार्डसकडून अभिमन्यू चौहानने ७१ चेंडूत ९ चौकार व २ षटकारासह ६७ धावा, रोहित करंजकरने शंभर चेंडूत १२ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ७४ धावा ठोकत १३४ चेंडूत ११२ धावांची भागीदारी केली.
यानंतर अमन मुल्लाने ७३ चेंडूत ७ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ५३ धावा केल्या. आर्शीन देशमुखने नाबाद ६९ धावा काढून संघाला पहिल्या डावात ६४ धावांची आघाडी मिळवून दिली. व्हिजन क्रिकेट अकादमीकडून रौनक राठी ३-३९, गणेश जोशी ३-७१, अक्षय पांचारिया २-४ यांनी सुरेख गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात व्हिजन क्रिकेट अकादमी संघाने ३७ षटकात २ बाद ११९ धावा केल्या. यात मयूर खरात नाबाद ३१ धावा, ऋषिकेश मोटकर नाबाद २१ धावांवर खेळत आहे. दोन्ही संघामधील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.