भुकेल्यांसाठी ते ठरताहेत 'अन्नदूत'; बारामतीतील तरुणांच्या कार्याला रोहित पवारांनी दिली शाबासकी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 03:08 PM2021-05-31T15:08:19+5:302021-05-31T15:11:49+5:30
दीड महिन्यांपासून २०० जणांना अन्नदानाचे कार्य सुरू ; बारामतीच्या तरुणांनी जपली सामाजिक बांधिलकी
सांगवी : कोरोनाच्या भीषण परिस्थितीत गरजूंच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. बारामती तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे अनेकांची उपासमार होत आहे. अशा कठीण प्रसंगात बारामतीमधील सात तरुणांनी माणुसकीचे दर्शन घडवत असून गेल्या दीड महिन्यांपासून त्यांनी भुकेल्या लोकांच्या दोन्हीही वेळच्या अन्न पाण्याची व्यवस्था केली आहे.
कोरोना लॉकडाऊन काळामध्ये अनेक कष्टकरी लोकांचे कामे बंद झाल्याने रस्ते, पदपथ, झोपडपट्टीत राहणारे, बस स्थानकात मुक्कामी राहणाऱ्या व हातावर पोट असलेल्यांचे दोन वेळच्या जेवणासाठी प्रचंड हाल झाले. हे दृश्य पाहुन बारामती शहरातील दानशूर तरूण एकत्रित आले आणी त्यांनी सामाजिक बांधीलकी जपत रोजच्या जेवणात २०० लोकांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करत माणुसकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
बारामतीतील आमराई भागातील दिनेश (सोनू) सोनवणे,यशवंत अवघडे,शुभम भिसे, विजय मोरे, संतोष जगताप, चंद्रकांत सावंत, जालिंदर उघडे अशी या अन्नदान करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. भुकेने व्याकुळ होऊन रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना जेवणाची पाकिटे वाटत आहेत. त्यांच्या समाजसेवेचे सगळीकडे कौतुक होतं आहे. त्यांच्या या कार्याबद्दल कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन तरुणांचे कौतुक केले आहे.
बारामतीत रस्ते, पदपथावरील नागरिकांसाठी या तरुणांनी १८ एप्रिल रोजी सुरू केलेला अन्नदानाचा उपक्रम आज देखील सुरू असून आजचा त्यांचा ४३ वा दिवसा आहे. तरुणांनी अद्याप देखील हा उपक्रम कायम ठेवला आहे. गरीबांची भूक भागवण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आणी हजारपेक्षा अधिक लोकांची भूक शमवली आहे.
संपूर्ण संचारबंदीच्या काळात (३१ मे) पर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याची माहिती दिनेश सोनवणे यांनी दिली. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी सूरू आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांना अडचणी येत आहेत. या काळात कोणी उपाशीपोटी राहू नये, यासाठी दिनेश सोनवणे व त्यांचे सहकारी मित्र हे गरजूंना घरपोच अन्नाची पाकिटे वाटप करीत आहेत. घरी अन्नाची पाकिटे तयार करून गरजूंपर्यंत पोचती केली जात आहेत.