रोहित पवारांचं अखेर ठरलं ! विधानसभेला ' कर्जत- जामखेड ' च्या आखाड्यातच लढायचं..!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 08:10 PM2019-07-25T20:10:42+5:302019-07-25T20:19:54+5:30
पक्षाचे वरिष्ठ नेते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षामार्फत लढण्याची संधी देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.
पुणे : मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एकच चर्चेला उधाण आले आहे ते म्हणजे शरद पवार यांचे नातू रोहित पवारांच्या विधानसभा रणांगणातल्या एंट्री...यावर अनेकवेळा खुद्द रोहित पवार यांनीही त्यांच्या उमेदवारीला दुजोरा दिला होता. अखेर त्यांनी कर्जत- जामखेड मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे व दिलीप वळसे पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर '' रोहित पवारांचं अखेर ठरलंय.. ' कर्जत- जामखेड' च्या आखाड्यात उतरायचं..! असं म्हट्लं तर वावगे ठरणार नाही ..
रोहित पवार हे गेल्या दोन वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये पक्षाचे आणि वैयक्तीक उपक्रम राबवत आहेत. मात्र इथेच लढणार असल्याची माहिती त्यांनी कधीही स्पष्टपणे दिली नव्हती. दुसरीकडे पुण्यातील हडपसर मतदारसंघामध्येही त्यांनी चाचपणी केली होती. पण अखेर त्यांनी सर्व बाबतीत सुरक्षित असलेल्या कर्जतची निवड केली आहे. इथे त्यांचा सामना भाजपचे मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्याशी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या फेसबुकवरून 'कर्जत-जामखेड का' अशी पोस्ट लिहून त्याबद्दलचे विचार मांडले आहेत.
काही दिवसांपूर्वी पवार यांनी यासंदर्भात फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, 'कर्जत जामखेड का याच उत्तर आहे काम करण्याची प्रचंड मोठ्ठी संधी. कोणत्या मतदारसंघातून लढणं सोप्प आहे हा विचार न करता कोणत्या मतदारसंघात काम करण्याची संधी आहे हा विचार मी केला. आजवर व्यावसायिक क्षेत्र असो की सामाजिक, राजकीय क्षेत्र यांत ज्या प्रमाणे लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला तसाच विश्वास ते टाकतील, किंबहुना त्यांनीच उमेदवारीची मागणी केल्याने एक इच्छुक म्हणून मी राष्ट्रवादी पक्षाकडे पक्षाच्या नियमांप्रमाणे अर्ज दाखल केला आहे. आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते माझ्या आजवरच्या सामाजिक, राजकीय कामांचा विचार करुन कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षामार्फत लढण्याची संधी देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो'. आता त्यांच्या या मागणीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेते काय प्रतिसाद देतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.