रोहित पवारांना वाटते आपणच खरे शरद पवारांचे वारसदार- चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 12:45 PM2023-09-22T12:45:20+5:302023-09-22T12:45:51+5:30
भरती प्रक्रिया वेळखाऊ असते, ती पूर्ण होईपर्यंत काम अडून राहू नये, यासाठी कंत्राटी भरती केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले....
पुणे : अजित पवार आमच्याकडे आले. त्यामुळे आता आपण शरद पवार यांचे खरे वारसदार आहाेत, असे आ. रोहित पवार यांना वाटू लागले असावे, असा टाेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. अर्थहीन गोष्टी शोधून काढण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. भरती प्रक्रिया वेळखाऊ असते, ती पूर्ण होईपर्यंत काम अडून राहू नये, यासाठी कंत्राटी भरती केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेश दर्शनासाठी गुरुवारी सकाळी पुण्यात आलेल्या बावनकुळे यांनी गणेश दर्शनापूर्वी भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी आ. रोहित पवार, तसेच विरोधकांच्या इंडिया आघाडीला लक्ष्य केले, त्याचबरोबर भाजपचे आ. गोपीनाथ पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर केलेली टीका अयोग्य होती, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. पडळकर यांच्याबरोबर यासंदर्भात आपण बोललो असून त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहिती देत मी अजित पवार यांची दिलगिरी व्यक्त करतो, असे बावनकुळे म्हणाले.
राजकीय मतभेद असतात ; मात्र मनभेद करू नयेत. व्यक्तिगत टीका टिप्पणी किंवा मर्यादा सोडून बोलणे हे राज्याच्या संस्कृतीत तर नाहीच ; भाजपच्याही संस्कृतीत बसत नाही. पडळकर यांना धनगर समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. भाजप त्यांच्याबरोबरच आहे. मराठा आरक्षणाला सर्वांचे समर्थन मिळाले, मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे भूमिका मांडली नाही, त्यामुळेच तिथे आरक्षण टिकले नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
भाजपचा प्लॅन बी वगैरे काहीच नाही. तशी गरजही नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून उत्तम काम करत आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून विनाकारण काहीही प्रश्न उपस्थित करत वादंग माजवले जाते. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सन्मान करतात. देशाला एक प्रभावशाली व्यक्ती राष्ट्रपतींच्या रूपाने मिळाल्या आहेत, असे बावनकुळे म्हणाले. आम्ही लोकसभेसाठी महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याच्या दृष्टिने बांधणी करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.