रोहित पवार मैदानात, तरुणांच्या प्रश्नांसाठी ८२० किमी पायी चालत करणार 'युवा संघर्ष यात्रा'
By राजू हिंगे | Published: October 3, 2023 01:59 PM2023-10-03T13:59:55+5:302023-10-03T14:00:28+5:30
दसऱ्याच्या मुहूर्तावर रोहित पवार यांची पुण्यातून युवा संघर्ष यात्रा...
पुणे : राज्यातील बेरोजगार तरुण, स्पर्धा परीक्षा देणारे युवा, डिग्री असूनही काम नसणारे विद्यार्थी, आर्थिक अडचण असलेले विद्यार्थी या सर्व समस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार युवा संघर्ष यात्रा'काढणार आहेत. पुण्यातून तुळापूरला जाऊन छत्रपती संभाजीमहाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन ही यात्रा सुरु होणार आहे. पायी यात्रेचे ८२० किलो मिटर अंतर असून ही यात्रा २४ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्यापासून सुरु होणार आहे. दिवसाला २७ ते २४ किलोमीटर चालणार आहे अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
पुण्यातून तुळापूरला जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन करणार आहे. ही यात्रा रोहित पवार आणि राष्ट्रवादीची नसणार ही यात्रा फक्त युवा तरुणांची असणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. या यात्रेत फक्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो असणार आहे. तरुण लोकांचे ऊर्जा स्थान पवार साहेब आहेत त्यामुळे या यात्रेत प्रवास करुन आम्ही तरुणांचे सगळे मुद्दे एकत्र करून येत्या हिवाळी अधिवेशनात आम्ही मांडणार आहे.
गेल्या काही दिवसात राजकारण कोणत्या लेव्हेलला गेले हे आपण पाहिले आहे. भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी फोडली. तरी आम्ही भूमिका न बदलता लढत राहिलो, अनेक आंदोलन करून फक्त शब्द मिळाले, पणं अडचणी सुटल्या नाहीत. माझ्या वाढदिवसानिमित्त मी बाहेर होतो, पणं माझ मन व्यथित होते. काल मी शरद पवारांना भेटलो, त्यांचे विचार आणि मार्गदर्शन घेतले. युवकांशी संपर्क साधला जावा यासाठी यात्रा काढणार आहे. यंदाची दिवाळी ही आम्ही यात्रेतच साजरी करणार आहे. यात्रेचा समारोप नागपूर येथे होणार आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.