खाते नसलेल्या बँकेत भरला मजुराचा रोहयोचा मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:11 AM2021-07-31T04:11:53+5:302021-07-31T04:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डिंभे : रोजगार हमी योजनेतून रोजी-रोटी मिळेल या हेतूने आहूपे येथील मजुराने तिन महिने काम केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डिंभे : रोजगार हमी योजनेतून रोजी-रोटी मिळेल या हेतूने आहूपे येथील मजुराने तिन महिने काम केले. आंबेगाव पंचायत समितीने आधार बेस पेमेंटद्वारे मजुराची मजुरीची रक्कम बँक ऑफ बडोदाच्या शाखेत जमा केली. मजुरी मिळण्याच्या आनंदात असतांनाच, असे कुठलेच खाते बँकेत नसल्याचे स्पष्टीकरण बँकेने दिल्याने एका मजुराचा हक्काचा मोबदला हरवल्याची घटना उघडकीस आली आहे. आपले खाते संबंधित बँकेत नसल्याचे मजुराने स्पष्ट करूनही शासकीय अधिकारी दखल घेत नसल्याने हक्काच्या मजुरीसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरे झिजवण्याची वेळ या मजुरावर आली आहे.
आहुपे (ता. आंबेगांव) येथील हेमंत हरिभाऊ पारधी हे त्यांच्या हक्काच्या मजुरी पासून वंचित राहिले आहेत. कोरोना काळात इतरत्र कुठेही मजुरी मिळत नसल्याने गावातच काम मिळाल्याने रोजी रोटीची सोय होईल म्हणून एकही दिवसाचा खाडा न करता पारधी यांनी तब्बल तीन महीने विना मोबदला रस्त्याच्या कामावर काम केले. आता दोन पैसे हताशी येतील या आशेने हेमंत पारधी काहीसे सुखावले होते. मात्र, जेव्हा मजुरीची वेळ आली तेव्हा त्यांची मजुरीच हरवल्याचे चित्र समोर आले. आंबेगांव तालुका पंचायत समिती रोजगार हमी विभागात चौकशी केली असता अधार बेस पेमेंट द्वारे तुमची मजुरी बँक आॅफ बडोदा शाखा अवसरी या शाखेकडे आपल्या अधार बेसवर काढण्यात आलेल्या खात्यावर वर्ग करण्यासाठी पाठविल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसे पत्रही गटविकास अधिकारी यांच्या सहीने शाखेस देण्यात आले आहे. गटविकास अधिकारी यांच्या पत्राच्या उत्तरा दाखल सबंधित मजुराचा अधार क्र.३१७० ८९७५ २१८६ या अधार क्रमांकाच्या बेस वर आमच्या शाखेत कोणतेच खाते सापडत नसल्याचे लेखी पत्रान्वये कळविले आहे. हेमंत पारधी यांनीही माझे या बँकेत खाते नसल्याचे सांगीतले आहे.
रोजगार हमीवर केलेल्या कामाची मजुरी मिळावी म्हणून आंबेगांव तालुक्याचे शेवटचे टोक आसणाऱ्या आहुपे गावापासून तालुक्याच्या पुर्वेला आसणाऱ्या अवसरी बँकेपर्यंत जवळपास १०० कि.मी. या मजुराने चार ते पाच वेळा हेलपाटे मारले आहेत. घोडेगाव येथेही पंचायत समितीमध्ये हेलपाटे मारून मारून त्यांची दमछाक झाली आहे. रणतणत्या उन्हात रस्त्याच्या कामावर जेवढी दमछाक होत नव्हती तेवढी दमछाक प्रमाणिकपणे केलेल्या कामाची मजुरी मिळविताना होत आसल्याचे हेमंत पारधी यांनी सांगितले. त्यांच्या हक्काच्या मजुरीची हमीच कोणी घ्यायला तयार नाही. रोजगार हमी विभाग बँकेकडे जा म्हणून सांगत आहे. तर बँक पंचायत समितीकडे जाण्यास सांगत आहे. यामध्ये प्रमाणिक पणे काम केलेल्या आदिवसी मजुरीची टोलवाटोलवी होत असून माझी हरवलेली मजुरी कोणी शोधून देईल का असा केविलवाना सवाल या मजुराकडून केला जात आहे.
सोबत- मजुर, हेमंत हरिभाऊ पारधी यांचा फोटो