आंदोलनाची भूमिका आज ठरणार

By Admin | Published: February 21, 2015 10:38 PM2015-02-21T22:38:56+5:302015-02-21T22:38:56+5:30

कॉंम्रेड गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडले जावेत, यासाठी उपोषण सुरू आहे.

The role of the movement will be decided today | आंदोलनाची भूमिका आज ठरणार

आंदोलनाची भूमिका आज ठरणार

googlenewsNext

पुणे : कॉंम्रेड गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडले जावेत, यासाठी उपोषण सुरू आहे. आंदोलन तीव्र करण्याबाबत रविवारी (दि. २२) भूमिका ठरविण्यासंदर्भात शहरातील पुरोगामी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
दरम्यान, उपोषणाला बसलेल्या तरुणांची शनिवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये अश्विनी सातव-डोके व हर्षल लोहकरे या दोघांची प्रकृती खालावल्याचे आढळले आहे. ‘किटोन'चे प्रमाण वाढल्याने उपोषणाचा कालावधी वाढल्यास या दोघांची किडनी निकामी होण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
१६ फेब्रुवारीला कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाला होता. पाच दिवस मृत्यूशी झुंज देत शुक्रवारी पानसरे यांची प्राणज्योत मालवली. १७ फेब्रुवारीपासून राजन दांडेकर, हनुमंत पवार, अश्विनी सातव-डोके व हर्षल लोहकरे या चार जणांनी उपोषण सुरू केले आहे.
पानसरे व दाभोलकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करावी, तसेच हल्ल्यामागे असणाऱ्या शक्तीचा शोध घ्यावा, आदी मागण्यांसाठी पाच दिवसांपासून विठ्ठल रामजी शिंदे पुलावर बेमुदत उपोषण सुरू आहे. (प्रतिनिधी)

मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार
डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हल्लेखोरांना तातडीने पकडावे, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने घ्यावी. मारेकऱ्यांसह यामागे असणारा मास्टर माईंडचा शोध घ्यावा. ज्या प्रतिगामी शक्ती यामागे असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, आदी मागण्या या पत्रातून करण्यात येणार आहेत. यासंदर्भात आंदोलकांसह कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांना पत्र पाठविणार आहेत. शनिवारी प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात आले.

गेल्या पाच दिवसांपासून आमच्या आंदोलनाला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये तरुणाईचा सहभाग मोठा आहे. तरुण कार्यकर्ते पथनाट्य, गीते यांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून आंदोलन करताना दहा हत्तींचे बळ आल्यासारखे वाटते. पानसरे अण्णांच्या हत्येबद्दल प्रचंड संताप आहे. आज दिवसभर आम्ही याबद्दल मौन बाळगले होते.
- राजन दांडेकर, उपोषणकर्ते

Web Title: The role of the movement will be decided today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.