ज्येष्ठ नागरिकांना आत्मानंद देणारा ‘रुपेरी कडा’
By Admin | Published: March 1, 2016 01:00 AM2016-03-01T01:00:13+5:302016-03-01T01:00:13+5:30
‘साठी बुद्धी नाठी’ ही म्हण खोटी ठरविण्याचा प्रयत्न प्राधिकरणातील ‘रुपेरी कडा कला मंचा’च्या वतीने केला जात आहे. विविध कलांची जोपासना करून स्वानंदाबरोबरच ज्येष्ठ सहकाऱ्यांना
शरद इंगळे, पिंपरी
‘साठी बुद्धी नाठी’ ही म्हण खोटी ठरविण्याचा प्रयत्न प्राधिकरणातील ‘रुपेरी कडा कला मंचा’च्या वतीने केला जात आहे. विविध कलांची जोपासना करून स्वानंदाबरोबरच ज्येष्ठ सहकाऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न ही संस्था करीत आहे.
शहरीकरणात एकत्रित कुटुंबपद्धती दुरापास्त होऊ लागली आहे. त्यामुळे निवृत्तीच्या कालखंडात ज्येष्ठांनी करायचे काय, असा प्रश्न आहे. शहरात प्रामुख्याने ही समस्या अधिक तीव्रतेने भेडसावते. मुले-मुली नोकरीला जातात. नातवंडेही शाळेत गेल्यानंतर वेळ घालवायचा कसा, असा प्रश्न ज्येष्ठांसमोर उभा राहतो. त्याचे उत्तर शोधण्यातून निगडी प्राधिकरणात ‘रुपेरी कडा कला मंच’ अस्तित्वात आला.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा, त्यास व्यासपीठ मिळवून द्यावे. त्यातून आनंददायी आयुष्य जगता यावे, या हेतूने पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण भागातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी एकत्रित येऊन २००१मध्ये कला मंचाची स्थापना केली. मंचाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. तसेच सकारात्मक जीवन कसे जगावे, याचेही मार्गदर्शन केले जाते. दुसरी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे विविध सामाजिक, प्रबोधनपर, संवेदनशील विषयांवर नाटक स्वत: ज्येष्ठ सभासद तयार करून सादर करतात.
अभिनय, साहित्य, नृत्य, गाणी असे विभाग मंचातर्फे करण्यात आले आहेत. सामाजिक विषय घेऊन जनजागृतीसाठी पुढाकार घेतला जातो. या मंचाने भ्रूणहत्येवर ‘लेक वाचवा’, एडसबाबत जनजागृती, प्रबोधन केले.