ऊस कारखानदारीमधील साटेलोटे उत्पादकांच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:12 AM2021-09-26T04:12:45+5:302021-09-26T04:12:45+5:30
(रविकिरण सासवडे) लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांमुळे ऊसपट्टा ढवळून निघू लागला आहे. मात्र, राजकारणाच्या ...
(रविकिरण सासवडे)
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांमुळे ऊसपट्टा ढवळून निघू लागला आहे. मात्र, राजकारणाच्या धामधुमीत ऊस उत्पादकांच्या मूळ प्रश्नाला बगल दिली जात आहे. ‘छत्रपती’ कारखान्याच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्मयोगी कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसने ‘सक्षम उमेदवार’ नसल्याने अंग काढून घेतले. थोड्याबहुत फरकाने इंदापूर- बारामती तालुक्यातील आगामी साखर कारखाना निवडणुकीत हे चित्र असणार आहे. मात्र, ऊस कारखानदारीमधील हे साटेलोटे ऊस उत्पादकांच्या मुळावर आले आहे. निवडणुका सोडून इतर वेळी होणारा तोंडदेखला विरोध काय कामाचा, अशी भावना सभासदांमधून व्यक्त होऊ लागली आहे.
इंदापूर- बारामती तालुक्यांमध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. इंदापूरमधील सध्या ‘कर्मयोगी’ व काही दिवसांत ‘छत्रपती’ कारखान्याची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे, तर बारामतीमध्ये ‘सोमेश्वर’च्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. इंदापूर तालुक्यातील बीजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अगदी ठरल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने ‘सक्षम उमेदवार’ नसल्याचे कारण देत निवडणुकीतून अंग काढून घेतले. इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये माजी मंत्र्यांचा पराभव केला. त्या इंदापूर तालुक्यात एका साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षाला उमेदवार मिळू नयेत ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल, तसेच यानंतर होणाऱ्या ‘छत्रपती’ कारखान्याच्या निवडणुकीसाठी केलेले हे साटेलोटे तर नाही ना, अशी चर्चादेखील सभासदांमध्ये सुरू झाली आहे. सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीन टप्प्यांमधील होऊ घातलेल्या एफआरपीच्या निर्णयाला विरोध केला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमती वाढत असताना केवळ आधारभूत किमतीसाठी होणारा आग्राह आणि त्याभोवती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेळले जाणारे राजकारण सभासदांना वेड्यात काढण्याचा प्रकार असल्याचेही या विषयातले जाणकार सांगत आहेत. स्थानिक रुसव्याफुगव्यांमध्ये तसेच फोडाफोडीच्या राजकारणामध्ये मूळ प्रश्नांना बगल दिली जात असल्याचीही चर्चा यानिमित्ताने ऊसपट्ट्यात सुरू झाली आहे.
--------------------------------
आम्हाला वाटले म्हणून आम्ही माघार घेतली...
कर्मयोगी कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीने घेतलेल्या माघारीबाबत माध्यमांनी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छेडले असता, ‘तो आमचा प्रश्न आहे. आम्हाला वाटले, आम्ही माघार घेतली. विषय संपला. आमच्यावर कुणाचे काय बंधन आहे का,’ अशा शब्दांत कर्मयोगीच्या निवडणुकीत रस नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवून दिले.
------------------------------
महाराष्ट्रातील २०० ते २५० घराणी सातत्याने आलटूनपालटून सत्तास्थानी आली आहेत. अगदी गावगाड्यापासून ते राज्यपातळीपर्यंत या साट्यालोट्याचे संदर्भ नवीन नाहीत. मुळात इंदापूर- बारामती या पट्ट्यामध्ये जे साखर कारखाने आहेत. ते सर्व साटेलोटे पद्धतीने चालवले जातात. हिस्सेदारी वाटून घेणे, हा फंडा त्याठिकाणी आहे. जनतेने ही षड्यंत्रे ओळखली पाहिजेत. आपल्या घामातून उभे राहिलेले साखर कारखाने वाचवावेत.
-डॉ. जालंदर पाटील,
प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष
---------------------------
राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेऊन एक प्रकारे कर्मयोगीमध्ये सुरू असलेल्या चुकीच्या कारभाराला मूक संमती दिली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रातील गावांमधून राष्ट्रवादी काँग्रेसला ५० ते ५५ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे ‘सक्षम उमेदवार’ नाही म्हणणे म्हणजे पळपुटेपणा आहे. मात्र, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्याठिकाणी गुलाबराव फलफले निवडणूक लढवत आहेत.
- पांडुरंग रायते,
जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना, पुणे
--------------------------------
सहकारी साखर कारखान्यांमध्ये ऊस उत्पदकांसाठी भांडणारा सक्षम विरोधक, तसेच संवेदनशील सत्ताधारी असणे गरजेचे असते. दुर्दैवाने अशी माणसे सध्या नाहीत. सत्तेमध्ये कोणीही आले तरी ऊस उत्पादकांची बाजू प्रभावीपणे मांडणारी व्यक्ती हवी आहे. उमेदवार सक्षम आहे का, नाही याचे परीक्षण सभासदांवर सोडले पाहिजे. मात्र, लोकशाही मार्गाने निवडणुका व्हायला हव्यात, असे ‘कर्मयोगी’ कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील एका ऊस उत्पादक सभासदाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.