मास्कची दोरी पुण्याच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 04:06 AM2020-04-30T04:06:59+5:302020-04-30T04:07:09+5:30
या मास्कसाठी लागणारा रबर टेप (ताणली जाणारी दोरी) देशासह जगभरात पुरविण्याची जबाबदारी पुणेकर कंपनीने पार पाडली आहे.
विशाल शिर्के
पुणे : कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रसार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या सुरक्षा उपायांमध्ये मास्कचा वापर महत्त्वाचा मानला जातो. या मास्कसाठी लागणारा रबर टेप (ताणली जाणारी दोरी) देशासह जगभरात पुरविण्याची जबाबदारी पुणेकर कंपनीने पार पाडली आहे. तब्बल तीन कोटी मास्क तयार होतील इतक्या दोऱ्यांचे वितरण झाल्याची माहिती गरवारे बीस्ट्रेच लिमिटेड (जीबीएल) कंपनीच्या वतीने देण्यात आली.
जगभरात कोरोना बाधितांची संख्या आता तीस लाखांच्या दिशेने चालली आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना सुरक्षेचा उपाय म्हणून मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. वैद्यकीय कर्मचारी, सरकारी अधिकारी, किराणा दुकानांपासून विविध अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाºया व्यक्तींना तर याची नितांत आवश्यकता आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी देखील मास्क वापरणे बंधनकारक आहे.
कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर, सॅनिटायझर, जंतूनाशकांबरोबरच मास्कची मागणी कित्येक पटींनी वाढली आहे. पुण्यातील गरवारे बीस्ट्रेच कंपनीच्या वतीने मास्कसाठी लागणाºया इलॅस्टिक दोरीचे उत्पादन केले जाते.
गरवारेने तब्बल दहा टन रबर टेपचा सप्लाय मास्क तयार करणाºया भारतीय कंपन्यांना केला आहे. त्यात सातत्याने वाढ होत आहे. या शिवाय अमेरिका आणि युरोपियन
देशांमध्ये तब्बल ३ कोटींहून अधिक मास्क तयार होतील, इतक्या रबर टेपचा पुरवठा केल्याची माहिती गरवारे कंपनीने दिली. गरवारे बीस्ट्रेच लिमिटेडच्या अध्यक्ष दिया गरवारे-इबानेझ यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
मास्क ही अत्यावश्यक वस्तू असल्याने त्याच्या निर्मितीची प्रक्रिया खंडीत होता कामा नये. त्यासाठी कंपनीमधे खबरदारी शारीरिक अंतर राखून कामगार काम करीत आहेत. दररोज कामगारांच्या शरीराचे तापमान मोजले जाते. त्याच बरोबर सॅनिटायझर आणि मास्कचे देखील त्यांना वितरण केले जाते. तसेच, अत्यावश्यक स्थितीमधे काही कामगारांना वर्क फ्रॉम होमची देखील सुविधा देण्यात आल्याची माहिती कंपनी कडून देण्यात आली.