‘स्वीकृत’साठी रस्सीखेच

By admin | Published: March 27, 2017 03:09 AM2017-03-27T03:09:50+5:302017-03-27T03:09:50+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्याने पाचपैकी तीन जागा मिळणार आहेत. स्वीकृत नगरसेवकपदाची संधी

Rope picking for 'Approved' | ‘स्वीकृत’साठी रस्सीखेच

‘स्वीकृत’साठी रस्सीखेच

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्याने पाचपैकी तीन जागा मिळणार आहेत. स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळावी यासाठी भाजपाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी
सुरू केली आहे. याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांत रस्सीखेच आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ७७, राष्ट्रवादी काँग्रेसला ३६, शिवसेना ९, अपक्षांना ५, मनसेला १ जागा मिळाली. एकूण १२८ जागा आहेत. त्यामुळे पाच स्वीकृत सदस्यांची निवड करता येते. भाजपाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार त्यांना तीन जागा मिळणार आहेत. तर उर्वरित दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षास अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळणार आहे. एप्रिल महिन्यातील सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे.
शहर भाजपात जुन्या-नव्यांचा वाद, गडकरी आणि मुंडे असे दोन गट आहेत. गेल्या वर्षभरापासून नवीन नेते पक्षात आले आहेत. त्यामुळे निष्ठावान आणि आयाराम असा वाद निर्माण झाला आहे. निवडणुकीनंतर महापौर नितीन काळजे यांची महापौरपदी निवडीच्या वेळीही वाद उफाळून आला आहे. नितीन गडकरी गटाचे आणि जुने कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ पवार यांना सत्तारूढ पक्षनेतेपद दिले. त्यामुळे स्वीकृत सदस्यपदी मुंडे गटाच्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्याची मागणी आहे. स्वीकृत सदस्यपदासाठी माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश पदाधिकारी महेश कुलकर्णी, सारंग कामतेकर, अमोल थोरात, संघटन सरचिटणीस माऊली थोरात, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक, सरचिटणीस बाबू नायर, राजेश पिल्ले, सूरज बाबर, निहाल पानसरे यांच्या नावाची चर्चा आहे. स्वीकृत सदस्यपद आयारामांना देऊ नये, अशी मागणी ज्येष्ठांनी केली आहे. शहर पदाधिकाऱ्यांत एकमत नसल्याने निवडीचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात गेला आहे.(प्रतिनिधी)

अपक्षांचा स्वतंत्र गट : शिवसेनेला नाही एकही जागा
 राष्ट्रवादीचे दोन सदस्य निवडले जाणार आहेत. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, अतुल शितोळे, नारायण बहिरवाडे, विजय गावडे, संजय वाबळे, उल्हास शेट्टी, जालिंदर शिंदे, तानाजी खाडे यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांच्यासाठी राष्ट्रवादीची एक जागा कमी करून अपक्षांची आघाडी करण्याचा प्रयत्न होता. मात्र, ऐनवेळी अपक्षांनी स्वतंत्र गटांची नोंदणी केली. त्यामुळे शिवसेनेला एक जागा मिळण्याचा प्रयत्न सफल होऊ शकला नाही.

Web Title: Rope picking for 'Approved'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.