राजगडवर ‘रोप वे’ स्वागतार्ह; पण अपप्रवृत्तींना आळा कोण घालणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:23+5:302021-06-16T04:15:23+5:30
दुर्गप्रेमींचा सवाल : गडाचे पावित्र्य राखण्यासाठी शासनाने काळजी घेण्याची मागणी (भाग -१) लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राजगड किल्ल्यावर ...
दुर्गप्रेमींचा सवाल : गडाचे पावित्र्य राखण्यासाठी शासनाने काळजी घेण्याची मागणी
(भाग -१)
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राजगड किल्ल्यावर ‘रोप वे’ची निर्मिती बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वातून करण्यात येणार आहे. याचे दुर्गसंवर्धक आणि दुर्गप्रेमींनी स्वागत केले आहे. मात्र, रोप वे केल्यानंतर किल्ल्यावर येणाऱ्या अपप्रवृत्तींना आळा कोण घालणार, असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे. गडाचे पावित्र्य धोक्यात येऊ नये, यासाठी शासनानी आधी काळजी घेऊन नियोजन करावे आणि नंतरच ‘रोप वे’ची निर्मिती करावी, अशी मागणी देखील केली आहे.
भारतीय पोर्ट रेल व ‘रोप वे’ महामंडळ (आयपीआरसीएल) यांच्यासोबत पर्यटन संचालनालयाने (डीओटी) सामंजस्य करार नुकताच केला. राज्यातील कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) यांच्यासमवेतही सामंजस्य करार केला आहे. बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर हा ‘रोप वे’ बांधण्याचे प्रस्तावित आहे. पर्यटन विभागाचा हा पथदर्शी प्रकल्प असेल, असेही सांगितले जात आहे.
सध्या दुर्गसंवर्धक, ट्रेकर्स आणि संशोधक यांचे किल्ल्यावर जाण्याचे प्रमाण जास्त आहे. ‘रोप वे’ होणार असल्याने यामध्ये सर्वसामान्य नागरिक देखील जाऊ शकतो. त्यामुळे गडावर गर्दी होण्याची शक्यता आहे. गडावरील पुरातन वास्तू, वाडे, इमारती आदी ऐतिहासिक स्थळांची मोडतोड होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच गडावर किती भूभाग सपाट आहे. त्यानुसार ‘रोप वे’साठी किती जागा लागणार आहे. त्याचबरोबर एकावेळी गडावर किती लोक सामावून घेता येतील, याचा विचार आधी शासनाने करावा. त्यानंतरच पुढील कामांना परवानगी द्यावी, अशी मागणी देखील केली आहे.
-------
कोट
‘रोप वे’ चांगला; पण सुरक्षेची व्यवस्था काय ?
शासनाचा निर्णय चांगला आहे. ‘रोप वे’मुळे एकाच वेळी अनेक लोक गडावर येणार आहेत. ही सर्व लोकं गडावर सामावून कशी घेणार आहे, गर्दी झाल्यावर लोकं सैरभैर कुठेही चढणार, उतरणार. त्यामुळे गडावरील ऐतिहासिक वास्तू पडण्याचा, मोडतोड होण्याचा धोका आहे. त्या लोकांवर नियंत्रण कसे मिळवणार आहे, आधीच अनेक किल्ल्यांवरील वास्तूंची पडझड झाली आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती, देखभाल होणे आवश्यक आहे. राजगडावर ज्या वास्तू सुस्थितीत आहेत. त्याची नासधूस होणार नाही, याची शासनाने खबरदारी घ्यावी. त्यानंतरच मग ‘रोप वे’ला परवानगी द्यावी.
- सचिन जोशी, संशोधक, पुरातत्त्व विभाग, डेक्कन कॉलेज
-------
कोट
मद्यपी, अपप्रवृत्तींना आळा घाला
छत्रपती शिवाजी महाराज यांची किल्ले राजगड ही पहिली राजधानी होती. त्यामुळे राजगडला ऐतिहासिक महत्त्व आहे. सध्या केवळ दुर्गभटके मावळे आणि संशोधन करण्यासाठी काही ठराविक लोक गडावर येतात. ‘रोप वे’ झाल्यावर शिवरायांवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांना देखील गड पाहण्याची संधी मिळणार आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, सहजपणे गडावर येता येते म्हणून अनेक मंडळी गर्दी, घाण करू शकतात. पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतात. गडावर कचरा करणाऱ्या आणि मद्यपी लोकांना प्रतिबंध करण्यासाठी शासनाने सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा गडाचे ऐतिहासिक पावित्र्य धोक्यात येऊ शकते.
- संदीप तापकीर, दुर्ग अभ्यासक
--------
पर्यटन वाढीसाठी निर्णय चांगला; पण पावित्र्य जपणे आवश्यक
राजगडावर ‘रोप वे’ची निर्मिती केल्याने पर्यटन वाढून शासनाला आर्थिक उत्पन्न मिळणार असेल तर चांगले आहे. मात्र, त्या उत्पन्नातूनच गडाचे संवर्धन व्हावे. कारण राज्यातील अनेक किल्ल्यांची दुरवस्था, पडझड झाली आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडे अनास्थेमुळे सर्वच पातळ्यांवर दुर्लक्ष होत आहे. ‘रोप वे’ बनवण्यापूर्वी शासनाने कार्यशाळा घेऊन रोडमॅप मांडावा. पर्यटन वाढीबरोबरच गडावर खासगी व्यावसायिक वापर किती होणार आहे. आदी विविध बाबी लोकांना अवगत करणे गरजेचे आहे.
- भगवान चवले, एव्हरेस्टवीर आणि दुर्ग अभ्यासक