‘व्हॅलेंटाइन डे’साठी गुलाब तयार
By Admin | Published: January 30, 2015 03:34 AM2015-01-30T03:34:59+5:302015-01-30T03:34:59+5:30
अवघ्या १५ दिवसांवर आलेल्या व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील गुलाब उत्पादकांची लगबग सुरू झाली आहे. पूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक फुल उत्पादन मावळ तालुक्यात होत आहे.
विशाल आसवले, टाकवे बुद्रुक
अवघ्या १५ दिवसांवर आलेल्या व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील गुलाब उत्पादकांची लगबग सुरू झाली आहे. पूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक फुल उत्पादन मावळ तालुक्यात होत आहे.
मावळचा शेतकरी व्हॅलेंटाइन डेसाठी नियोजन करून फुल उत्पादन घेत असतो. त्यासाठी ते एक ते दोन महिने अगोदर तयारी सुरू करतात. १ ते १० डिसेंबर या कालावधीमध्ये गुलाबांच्या झाडांचे कटिंग केले जाते. त्यानंतर विविध प्रकारची खते, औषधे दिले जातात. ४५ ते ५० दिवसांत येण्यासाठी खूप काळजी घेतली जाते. नियोजनानुसार २५ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत फुले विक्रीसाठी तयार केली जातात. या वर्षी आभाळ येण्याचे प्रमाण कमी आहे. पोषक वातावरणामुळे गुलाबावर जास्त प्रमाणात किड न पडल्याने फुले अधिक टवटवीत राहण्याची काळजी शेतकरी घेत आहेत. या वर्षी रोगाचे प्रमाण कमी असल्याने अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
व्हॅलेंटाइन डेसाठी लाब गुलाबाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यात टॉप सिक्रेट, सामुराई, बोरडेक्स, कप्पर क्लास या जातींना विशेष मागणी असते.त्या पाठोपाठ गोल्डस्ट्राईक (पिवळा), पॉयझन (पिंक), भावलॉच (पांढरा), ट्रॉपिकल (नारंगी), झाकेरा (पिंक) या जातींना मागणी असते. फुलाचे दर प्रति सेंटिमीटरवर अवलंबून असतात. ४० सेंमी फुलांचे दर ८ ते १० रुपये, ५० सेंमी फुलाचे दर १० ते १२ आणि ६० सेंमी फुलाचे दर १२ ते १४ रुपयापर्यंत आहेत. ही फुले १० ते १२ दिवसांच्या कालावधीत विकली जातात. मागणी तेजीत असल्याने ही निर्यातक्षम फुले स्थानिक बाजारातही १० ते १२ रुपयेपर्यंत विकली जातात. प्रति एकरी ३० ते ४० हजारांच्या आसपास ही फुले मिळतात. निर्यातीला चांगला दर मिळाला तर प्रति फुलाला १५ ते १६ रुपये मिळतात. म्हणजे ५ ते ६ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. मावळातील गुलाब कोठारे फ्लोरा, आरईव्ह फ्लोरा, सोलकस फ्लोरा या कंपन्यांच्या अंतर्गत निर्यात केला जातो. मावळात फुल उत्पादन चांगल्या प्रमाणात मिळत असल्याने तसेच लाल माती, मुबलक पाणी, अनुकूल वातावरण असल्याने येथे दिवसेंदिवस पॉलिहाऊसची संख्या वाढत आहे.