गुलाबपाणी अन् चंदनाचा टिळा; 'खळ्ळ खटॅक'वाल्या मनसेचा रंग वेगळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 13:43 IST2019-12-20T13:40:43+5:302019-12-20T13:43:45+5:30
आजपासून ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या काळात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आज मनसेचे राज्यभरातील तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे शिबीर संपन्न होणार आहे तर उद्या डेक्कन जिमखाना येथे मनसेचे सरचिटणीस आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडणार आहे.

गुलाबपाणी अन् चंदनाचा टिळा; 'खळ्ळ खटॅक'वाल्या मनसेचा रंग वेगळा
पुणे : एका निरोपावर राज्यभरातून आलेले लोक...अनेक महिन्यांनी झालेल्या गाठीभेटी, रंगलेल्या गप्पा आणि सुरुवातीला प्रवेश करताना लावण्यात येणारा चंदनाचा टिळा हे दृश्य कोणत्याही लग्नातले नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिबीरातले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आजपासून ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या काळात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आज मनसेचे राज्यभरातील तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे शिबीर संपन्न होणार आहे तर उद्या डेक्कन जिमखाना येथे मनसेचे सरचिटणीस आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडणार आहे.
आजच्या शिबीरातले स्वागतही अनोख्या पद्धतीने केले जात होते. चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी घालून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना लावण्यात येत होते. शिबीराविषयी माहिती देताना मनसे नेते बाबू वागस्कर यांनी सांगितले की, 'या शिबीराला साधारण साडेआठशे पदाधिकारी हजर आहेत. पक्षाची भूमिका, 'पक्षवाढ, राजकीय निर्णय आणि संबंधित विषयांवर ठाकरे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत'.या शिबीराकरिता मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर उपस्थित आहेत. तसेच अमित ठाकरे यांनीही हजेरी लावली आहे.
मनसेचे कार्यकर्ते हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात, प्रसंगी रस्त्यावर उतारायलाही ते कमी करत नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी भर थंडीत हा शीतल गुणधर्म असणारा टिळा लावला जात आहे की काय असेही पदाधिकारी गमतीत म्हणत होते. मनसेचे 'खळ्ळ खट्याक', ';लाव रे तो व्हिडीओ' गाजले होते तसेच हे स्वागतही चर्चेत राहील यात शंका नाही.