भारत साक्षरतेचा रोटरीचा संकल्प
By admin | Published: October 3, 2016 01:48 AM2016-10-03T01:48:50+5:302016-10-03T01:48:50+5:30
पोलिओ संपूर्ण निर्मूलन करण्यात सिंहाचा वाटा उचलल्यानंतर, आता संपूर्ण भारत साक्षर करण्याचा संकल्प रोटरी क्लबने घेतला
पुणे : पोलिओ संपूर्ण निर्मूलन करण्यात सिंहाचा वाटा उचलल्यानंतर, आता संपूर्ण भारत साक्षर करण्याचा संकल्प रोटरी क्लबने घेतला असून, त्यासाठी २०२० हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे़ या दिशेने कोणती पावले उचलता येतील, याची दिशा रोटरी एक्स्पो २०१६ मध्ये झालेल्या परिसंवादात ठरविण्यात आली़
कर्वेनगर येथील पंडित फार्म येथे ‘लोकमत’च्या सहयोगाने रोटरीच्या उपक्रमांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते़ त्यात व्हिजन २०२० हा परिसंवाद झाला़ या परिसंवादात रोटरी जिल्हा ३१३१ चे सदस्य उपस्थित होते़
रोटरी इंटरनॅशनलचे संचालक डॉ़ मनोज देसाई यांनी व्हिजन २०२० ची सदस्यांना माहिती दिली़ देशातून पोलिओचे निर्मूलन करण्याचा संकल्प रोटरी इंटरनॅशनलने १९८५ मध्ये करुन या कार्याची सुरुवात केली़ देशभरातून आता पोलिओचे उच्चाटन होत आले आहे़ पोलिओनंतर आता संपूर्ण देश १०० टक्के साक्षर करण्याचा संकल्प रोटरी क्लबने केला आहे़ त्यादिशेने कोणती पावले उचलावीत, २०२०मध्ये रोटरी क्लबने कोठे असावे़ ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षित करणे, तळागाळातील अशिक्षित लोकांपर्यंत कसे पोहचावे, त्यासाठी कोणकोणते उपक्रम हाती घ्यावे लागतील, याविषयीचे मार्गदर्शन डॉ़ देसाईने सदस्यांना केले़