आडव्या बाटलीसाठी होणार फेरमतदान
By admin | Published: February 3, 2016 01:40 AM2016-02-03T01:40:27+5:302016-02-03T01:40:27+5:30
बाटली उभी रहावी म्हणून कितीही आटापिटा केला तरीही महिला शक्तीपुढे अखेर नमावे लागले आहे. महिलांच्या निर्धारामुळे निघोज गावातील दारुबंदीसाठीचे मतदान पुन्हा नव्याने घेण्याचे
टाकळीहाजी : बाटली उभी रहावी म्हणून कितीही आटापिटा केला तरीही महिला शक्तीपुढे अखेर नमावे लागले आहे. महिलांच्या निर्धारामुळे निघोज गावातील दारुबंदीसाठीचे मतदान पुन्हा नव्याने घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
निघोज (ता. पारनेर) येथील दारूबंदी महिला चळवळीने गावात बाटली आडवी करण्यासाठी लढा उभारला. मात्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेतील गोंधळामुळे मात्र या महिलांना तांत्रिक कारणास्तव पराभवाला सामोरे जावे लागले होते. तरीही हार न मानता त्यांनी दारुबंदीच्या विरोधात पुन्हा कंबर कसली आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे ज्येष्ठ नेते अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याने महिलांच्या निर्धाराला मोठे पाठबळ लाभले. अण्णा हजारे यांच्यासह पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार विजय औटी यांनीही या प्रकरणी लक्ष घातले. आडव्या बाटलीसाठी फेरमतदान घेण्याचे आदेश देण्यात आल्याने दारूधंदावाले व त्यामध्ये गडबड घोटाळा करणारे अधिकारी मात्र हादरले आहेत. जिल्हा नियोजन मंडळाच्या सोमवारच्या बैठकीत यावर आमदार विजय औटी यांनी शिंदे व प्रशासनाचे लक्ष वेधून निघोजचे महिलांचे आंदोलन व संबंधित खात्याची भूमिका, यावर चर्चा घडवून आणली. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याची सविस्तर चौकशी करून फेरमतदान घेण्याचे आदेश दिले. आठ दिवसांपूर्वी दारूबंदीसाठी मतदान घेण्यात आले; मात्र उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांनी निकाल यंत्रणा फिरविली असल्याचा महिलांचा आक्षेप होता. त्यामुळे अवघ्या ७० मतांनी दारूबंदी फेटाळली गेली. चार हजार महिलांचे मतदान असणाऱ्या गांवामध्ये मतदानासाठी २,५०० महिला आल्या होत्या; मात्र मतदार यादीत नावच नाही, ओळखपत्र नाही, अशी कारणे पुढे करून उत्पादनशुल्क खात्याने अनेक महिलांना मतदान प्रक्रियेत भाग घेऊ दिला नव्हता. ५०० महिलांना मतदानात भाग न घेता परत जावे लागले. मतदान झालेल्या दोन हजार मतदानातसुद्धा बाद मतांचे प्रमाण सर्वाधिक होते. ‘हा पराभव केवळ या भ्रष्ट यंत्रणेने केला असून, आम्हाला न्याय न दिल्यास कायदाच हातात घेऊ; मग आम्हाला तुरुंगात टाका किंवा फासावर चढवा,’ असा निर्वाणीचा इशारा देत महिला संघटनेने जोरदार आंदोलन केल.