घासातला घास देत माणुसकीचे दर्शन घडविणारा 'रोटी डे' ; येरवडा परिसरातला स्तुत्य उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 06:04 PM2021-03-01T18:04:55+5:302021-03-01T18:05:23+5:30
आपल्या परिसरातील भुकेल्या व्यक्तींना एक वेळचं जेवण देणं ही या रोटी डेची साधी संकल्पना आहे.
येरवडा: लॉकडाउनमध्ये अनेकांना उपाशी राहावे लागले. ही परिस्थिती कोणावरच येऊ नये म्हणून गेली अनेक वर्ष पुण्यात 'रोटी डे' साजरा करण्यात येतो. सोमवारी( दि. १) येरवडा परिसरात हा रोटी डे साजरा करण्यात आला. यंदा या उपक्रमाचे सातवे वर्ष आहे
आपल्या परिसरातील भुकेल्या व्यक्तींना एक वेळचं जेवण देणं ही या रोटी डेची साधी संकल्पना आहे. आपल्या घासातला घास देत लोकांची भूक भागवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला. येरवडा परिसरात सोमवारी आयोजित करण्यात आला होता. हुतात्मा गार्डन मित्रपरिवार व महात्मा फुले जेष्ठ नागरिक संघ यांच्यासोबत "आमचं घर हाउसफुल" या विनोदी नाटकातील कलाकार या उपक्रमात सहभागी झाले होते.
लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकानेच आपल्या क्षमतेप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. अशाच पद्धतीने माणुसकीचे दर्शन घडवणारा "रोटी डे"हा उपक्रम आपल्या परिसरात राबवावा, असे आवाहन या निमित्ताने सिने-नाट्य अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यांनी उपस्थितांना केले.
"रोटी डे" या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमचं घर हाउसफुल या विनोदी नाटकातील कलाकार विनोद खेडकर, सागर पवार, स्वप्ना दुर्वे, आनंद जोशी, हेमंत धनवे, मयुर जोशी, शताक्षी झाडबुके, सुप्रिया पवार उपस्थित होते.