अंगावर झेप घेऊन मनगटाचा चावा घेतला; रॉटव्हिलर कुत्र्याच्या हॅण्डलरवर गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Updated: April 10, 2025 17:43 IST2025-04-10T17:39:28+5:302025-04-10T17:43:33+5:30
कुत्रा सार्वजनिक ठिकाणी मोकळा सोडल्यामुळे हयगयीचे वर्तन करत त्याने एकावर हल्ला करून जखमी केले

अंगावर झेप घेऊन मनगटाचा चावा घेतला; रॉटव्हिलर कुत्र्याच्या हॅण्डलरवर गुन्हा दाखल
पुणे : सकाळी जॉगिंग करत असताना, रॉटव्हिलर जातीच्या कुत्र्याने एका अभियंत्याचा चावा घेतला. त्यामध्ये अभियंत्याच्या हाताला आणि मनगटाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी, कुत्र्याच्या हॅण्डलर (सांभाळणाऱ्यावर) बाणेरपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अभी (पूर्ण नाव पत्ता नाही) असे हॅण्डलरचे नाव आहे. याबाबत सुयोग राऊत (४९, रा. पॅनकार्ड क्लब रोड, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २३ मार्च रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास पाषाण परिसरातील विरभद्रनगरकडे जाणार्या सर्व्हिस रोडवर घडला आहे.
पाळीव कुत्र्यामुळे मानवी जीवितास होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी पुरेशी उपायोजना न करता कोणतीही खबरदारी न घेता कुत्रा सार्वजनिक ठिकाणी मोकळा सोडल्यामुळे कोणाच्यातरी जिवितास धोका निर्माण होईल याची जाणीव असताना सुद्धा कुत्र्याला मोकळे सोडून हयगयीचे वर्तन केल्यामुळे त्याने राऊत यांच्यावर हल्ला करून जखमी केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राऊत हे पॅनकार्ड क्लबरोडने जॉगिंग करत होते. सकाळी साडे सातच्या सुमारास विरभद्रनगरकडे जाणाऱ्या लेनवर असताना, त्यांना पाठीमागून कोणीतरी धावत येत असल्याचा आवाज आला. काही समजण्याच्या अगोदरच कुत्र्याने त्यांच्या अंगावर झेप घेऊन हाताचा पंजा आणि मनगटाचा चावा घेतला. त्यावेळी त्याचा हॅण्डलर पळत आला आणि बेल्ट लावून त्याने कुत्र्याला ताब्यात घेतले. राऊत यांनी खासगी रुग्णालयात धाव घेत उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानुसार पोलिसांनी अभी नावाच्या हॅण्डलरवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हा कुत्रा नयनाज इराणी यांचा असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यापूर्वी देखील शहरात कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील या करत आहेत.