जात प्रमाणपत्रासाठी माराव्या लागतात फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:29+5:302020-12-27T04:08:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासह प्रशासकीय कामासाठी लागणारे जातप्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा तयार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासह प्रशासकीय कामासाठी लागणारे जातप्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा तयार केली जात आहे. मात्र, मुळ कागदपत्र सादर केल्यानंतर ही कागदपत्र चालत नाहीत. सन १९५० पूर्वीचे पुरावे सादर करा, पूर्वीचे नियम आता बदलले आहेत, अशी उत्तरे देत नागरी सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना टाळले जात आहे. यामुळे नागरिकांवर हेलपाटे घालण्याची वेळ आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली शाळा-महाविद्यालये सुरू होण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, फार्मसी आदी व्यावसायीक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी शैक्षणिक संस्थांकडून केली जाते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काही सुविधा केंद्रात गर्दी होत आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने सुरू असली तरी जातीचा दाखला मिळविण्यासाठी अर्जदाराच्या रक्ताच्या नातेवाईकाची काही मूळ कागदपत्र सादर करावी लागतात. संबंधित कागदपत्र सादर करूनही ही दाखला काढण्यासाठी चालणार नाही. दुसरी घेऊन या,असे सांगून नागरिकांना दाखला देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे.
अविनाश शिंदे यांनी बहिणीचा जात दाखला काढण्यासाठी सुविधा केंद्रात अर्ज केला. त्यासाठी चुलत्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले. मात्र, हे प्रमाणपत्र चालत नाही. १९५० पूर्वीचे पुरावे द्यावे लागतील, असे सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. शासन निर्णयाप्रमाणे एखाद्याच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यनंतर इतर पुरावे सादर करण्याची आवश्यकता नसते. तरीही नागरिकांना उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत.
चौकट
चुलत्यांच्या जात वैधाता प्रमाणपत्राच्या आधारे मी माझ्या दोन मुलांचे जातीचे दाखल काढले. त्याच प्रमाणपत्रावर बहिणीचा दाखल मिळवण्यासाठी अर्ज केला; तर हे चालणार नाही असे सांगत मला दोन दिवस टाळले. त्यामुळे मी संबंधित केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर माझा अर्ज जमा करून घेतला. त्यामुळे साधे दाखले मिळवण्यातही अडचणी येत आहेत.
- अविनाश शिंदे, नागरिक