वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व देवी जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:18 AM2021-02-28T04:18:50+5:302021-02-28T04:18:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परिंचे : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व देवी जोगेश्वरी यांचा शाही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परिंचे : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व देवी जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले. उत्सवानिमित्त मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच गाभाऱ्यात फुलांची सजावट केली होती. देवाच्या लग्न सोहळ्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
कोडीत (ता.पुरंदर) येथील पालखी व काठी घेऊन सर्व ग्रामस्थ मंडळी सायंकाळी ७ वाजता श्रीक्षेत्र वीर येथे दाखल झाली. यावेळी देवाची धूप आरती होऊन मुकादम पाटील विश्वस्त, ग्रामस्थ मंडळी, मानकरी, दागिनदार, सालकरी मंडळींच्या उपस्थितीत त्यांना सन्मानाने भेटाभेट होऊन वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. त्यानंतर काठी पालखीतळावर स्थानापन्न झाली. रात्री साडेअकरा वाजता समस्त राऊत मंडळींच्या वतीने देवांना पोशाख करून देवदेवतांना आव्हान करण्यात आले. श्रीनाथ मस्कोबा देवाच्या पालखीत उत्सव मूर्ती ठेवून ढोल-ताशाच्या गजरात तसेच कोडीची पालखी बाहेरून अंदाज चिंचणी येथे गेली. त्यावेळी शिंगाडे, तरडे, बुरुंगुले, ढवाण, व्हटकर या मानकऱ्यांना फुलाच्या माळा घातल्या. मानपान झाल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास सर्व काठ्या व पालख्या देऊळवाड्यात दाखल झाल्या. प्रथेप्रमाणे सर्व काठ्या व पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर मोजक्या मानकरी, विश्वस्त, भाविकांच्या उपस्थितीत गुरव पुजाऱ्यांनी देवाच्या उत्सव मूर्तींना अलंकार व पोषाखानी सजविण्यात आले.
गुरव समाजाच्या वतीने अक्षदा वाटप केल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता ग्राम पुरोहीत संतोष थिटे, दीपक थिटे, श्रीकांत थिटे यांनी मंत्रोच्चार सुरुवात करुन गावचे मुकादम पाटील बाळासाहेब ज्ञानोबा धुमाळ यांच्या हस्ते श्री नाथ मस्कोबा महाराज आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा पार पडला. काठ्या व पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा होऊन या हा सर्व लवाजमा देऊळ वाड्यातून भक्त कमळाजी व तुकाई टेकडीकडे मार्गस्थ झाला.
...
फोटो ओळ- श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना बाशिंग बांधून लग्न सोहळा साजरा झाला.