RPF हवालदाराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण, मुलांना डांबून उकळायचे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 09:53 AM2023-11-08T09:53:47+5:302023-11-08T09:55:39+5:30

बेकायदा संस्थेची मनसेकडून तोडफोड...

RPF constable rape case of minor girl, extorting money from children | RPF हवालदाराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण, मुलांना डांबून उकळायचे पैसे

RPF हवालदाराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण, मुलांना डांबून उकळायचे पैसे

पुणे : रेल्वे सुरक्षा दलातील (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) हवालदाराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी एका महिलेसह दोघांना अटक केली. हवालदाराने रेल्वेच्या जागेत बेकायदा सिद्धार्थ मल्टिपर्पज संस्था सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. या संस्थेत हवालदाराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. हवालदाराने साथीदारांच्या मदतीने रेल्वे स्थानकावर पळून आलेल्या आणखी काही मुलींवर अत्याचार केल्याचा संशय असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.

सुश्मिता कसबे आणि करण राठोड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना १२ नाेव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती लोहमार्ग पोलिस दलाचे अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

या प्रकरणात यापूर्वी कमलेश तिवारी (मूळ रा. उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली होती. रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) हवालदार अनिल पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार पसार झाला आहे. एका अल्पवयीन मुलीने पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडिता दहावीत शिकत होती. तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघे जण मूळचे छत्तीसगडमधील आहेत. गेल्या महिन्यात मुलगी आणि तिचा मित्र पुणे रेल्वे स्थानकात आले होते. हवालदार पवार याने सिद्धार्थ मल्टिपर्पज संस्थेत या मुलीला नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तिच्याबरोबरच्या तरुणाला धमकावून पैसे उकळले. मुलीच्या पालकांनी बेपत्ताची तक्रार छत्तीसगड पोलिसांकडे दिली होती. तिला घेऊन छत्तीसगड पोलिस गावी गेल्यावर तिने हा सर्व प्रकार घरी सांगितला. छत्तीसगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला. त्यांच्या तपासातून हवालदार पवार याचे काळे कृत्य समोर आले.

हवालदार पवार हा ताडीवाला रस्त्यावरील रेल्वेच्या जागेत पळून आलेल्या परगावच्या मुलींना हेरून त्यांना धमकावून पैसे उकळायचा तसेच परस्पर या मुलांना संस्थेत डांबून ठेवायचा, असे तपासात उघडकीस आले आहे. पवार याने या बेकायदा संस्थेत काही जणांना कामावर ठेवले होते. पुणे रेल्वे स्थानकात पळून आलेल्या मुलींना हेरण्यासाठी बेकायदा संस्थेतील कामगारांना काम दिले होते. त्यांना तो दरमहा पैसे द्यायचा. पसार झालेल्या पवारला निलंबित करण्यात आले असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. रेल्वे स्थानकात पळून आलेल्या अल्पवयीन मुलींना डांबून पवारने आणखी काही मुलींवर अत्याचार केल्याचा संशय आहे. पीडिता, तसेच कुटुंबीयांनी लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालय (संगम पूल) येथे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बेकायदा संस्थेची मनसेकडून तोडफोड

रेल्वेच्या जागेतील संस्थेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेतील कार्यालयाची मंगळवारी दुपारी तोडफोड केली. मनसेचे नेते वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटीच्या आवारात शिरून तोडफोड केली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मोरे यांनी यावेळी केली.

Web Title: RPF constable rape case of minor girl, extorting money from children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.