RPF: ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’, आरपीएफकडून ३ महिन्यांत ४०८ मुलांची सुटका
By नितीश गोवंडे | Published: July 21, 2023 08:02 PM2023-07-21T20:02:17+5:302023-07-21T20:07:07+5:30
किरकोळ भांडणामुळे, अथवा अन्य कौटुंबिक समस्यांमुळे मुले कुटुंबियांना न कळवता परस्पर निघून आल्याचे समोर आले
पुणे : रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेली असते. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत मुलांना वाचवण्याचीही जबाबदारी ते पार पाडतात. मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) ४०८ मुलांची सुटका केली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानक, तसेच प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांनी ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत या कामाला प्राधान्य दिले. या ४०८ मुलांमध्ये ३१८ मुले आणि ९० मुलींचा समावेश आहे. चाइल्डलाईन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मुलांचा पालकांशी संपर्क करून देण्यात आला.
घरातील किरकोळ भांडणामुळे, अथवा अन्य कौटुंबिक समस्यांमुळे तसेच काहीजण चांगले जीवन आणि शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न कळवता परस्पर निघून आल्याचे समोर आले. रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी बोलून त्यांच्या समस्या समजून घेतात आणि मुलांना पालकांशी पुन्हा, बोलण्याचा, भेटण्याचा सल्ला देतात.
एप्रिल ते जून दरम्यानची विभागनिहाय आकडेवारी..
- पुणे विभागाने १३८ मुलांची सुटका केली असून त्यात सर्व मुलांचाच समावेश आहे.
- मुंबई विभागाने ९२ मुलांची सुटका केली, त्यात ५८ मुले आणि ३४ मुलींचा समावेश आहे.
- भुसावळ विभागाने ९४ मुले आणि २५ मुलींचा समावेश असलेल्या ११९ मुलांची सुटका केली.
- नागपूर विभागाने ४० मुलांची सुटका केली असून त्यात २१ मुले आणि १९ मुलींचा समावेश आहे.
- सोलापूर विभागाने १९ मुलांची सुटका केली असून यामध्ये ७ मुले आणि १२ मुलींचा समावेश आहे.