आरपीआय हा भाजपचा मूळ मित्रपक्ष; पुण्याचे महापौरपद आरपीआयला मिळावे - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 11:17 IST2025-01-25T11:16:43+5:302025-01-25T11:17:05+5:30
महायुतीत यंदाच्या महापालिका निवडणुकीत कोण भाजपसोबत राहतील यात शंका आहे, आम्ही मात्र भाजपसोबतच राहणार

आरपीआय हा भाजपचा मूळ मित्रपक्ष; पुण्याचे महापौरपद आरपीआयला मिळावे - रामदास आठवले
पुणे : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबल्या आहेत. येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात या निवडणुका पार पडतील अशी शक्यता आहे. पुणे महापालिका निवडणुकीत मागच्या वेळी आम्हाला ५ जागा मिळाल्या होत्या. आता महायुती असली तरी यंदाच्या महापालिका निवडणुकीत कोण भाजपसोबत राहतील यात शंका आहे. मात्र, आरपीआय हा भाजपचा मूळ मित्रपक्ष असल्याने आम्ही पालिका निवडणुकीतही भाजपसोबतच राहणार आहोत, तसेच महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्यास ते आरपीयआयला मिळावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
व्हीआयपी सर्किट हाउस येथे आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, महेंद्र कांबळे, शैलेश चव्हाण, विरेन साठे, श्याम सदाफुले, महिपाल वाघमारे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, विशाल शेवाळे, उमेश कांबळे आदी उपस्थित होते.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ आराखाड्यासाठी १० कोटी द्यावेत
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भीमा कोरेगाव विजयस्तंभ जागेसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्मारकासाठी १५० एकर जागा सरकार देणार आहे. त्यातील साडेनऊ एकर जागेवर असलेले अतिक्रमण हटवावे, या स्मारकांच्या नियोजित आराखाड्यासाठी राज्य सरकारने तत्काल १० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.