‘जेएसपीएम’मध्ये दीड हजार कोटींचा आर्थिक घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:13 AM2021-01-03T04:13:33+5:302021-01-03T04:13:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळीने (जेएसपीएम) एआयसीटीई आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिक्षण शुल्क ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळीने (जेएसपीएम) एआयसीटीई आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिक्षण शुल्क समितीला खोटी माहिती दाखवून विद्यार्थ्यांकडून अधिकचे शुल्क आकारले. प्राध्यापकांनासुध्दा कमी वेतन देवून या संस्थेने गेल्या दहा वर्षात तब्बल १ हजार ६८० कोटींचा घोटाळा केला, असा दावा प्रा. पंकश शहा व प्रा. अमोल कोकरे यांनी शनिवारी (दि. २) पत्रकार परिषदेत केला.
‘जेएसपीएम’ या शैक्षणिक संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे वेतन व सॅलरी स्लिप दिली जात नाही. मात्र, एआयसीटीई-विद्यापीठ यांसारख्या शासकीय संस्थांना प्राध्यापकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या असलेली माहिती दिली जाते. त्यामुळे संस्थेविरोधात विद्यापीठाच्या तक्रार निवारण कक्षाकडे, तसेच वानवडी पोलिसांकडे या संदर्भातील तक्रार केली आहे, असे प्रा. पंकश शहा व प्रा. अमोल कोकरे यांनी सांगितले. संस्थेविरोधात केलेले सर्व आरोप ‘जेएसपीएम’च्या प्राचार्यांनी फेटाळले आहेत.
संस्थेकडून महाविद्यालयातील प्राध्यापकांना विद्यापीठाच्या परीक्षा संबंधितातील कामकाजाचे भत्ते, नियमानुसार महागाई भत्ता दिला जात नाही. मात्र, या संदर्भात कोणी विचारल्यास त्याला संस्थेतून निलंबित केले जाते. आम्हालाही त्यामुळेच संस्थेने निलंबित केले आहे, असा आरोप यावेळी शहा व कोकरे यांनी केला.
चौकट
प्रा. शहा व प्रा. कोकरे या दोघांविरोधात संस्थेकडे तक्रारी आल्या होत्या. राजीनामा दिल्याने ‘गुड बिहेविअर बॉण्ड’ प्रमाणपत्र देऊन संस्थेने त्यांना कार्यमुक्त केले. निलंबित केलेले नाही. संस्थेने एआयसीटीई व विद्यापीठाला सर्व माहिती नियमाप्रमाणे दिली आहे. पत्रकार परिषदेत संस्थेबाबत सादर केलेली कागदपत्र खोटी असू शकतात, असा दावा जेएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र कानफाडे यांनी केला आहे.