‘चितळें’कडे रु.२० लाख खंडणीची मागणी; एका शिक्षिकेसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:07 AM2021-06-19T04:07:57+5:302021-06-19T04:07:57+5:30

पुणे : दुधामध्ये काळ्या रंगाचा पदार्थ आढळून आला आहे. या भेसळीबाबत अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रार करू. ...

Rs 20 lakh ransom demand from Chitale; Three arrested, including a teacher | ‘चितळें’कडे रु.२० लाख खंडणीची मागणी; एका शिक्षिकेसह तिघांना अटक

‘चितळें’कडे रु.२० लाख खंडणीची मागणी; एका शिक्षिकेसह तिघांना अटक

Next

पुणे : दुधामध्ये काळ्या रंगाचा पदार्थ आढळून आला आहे. या भेसळीबाबत अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रार करू. हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा, अन्यथा तुमचे दुकान बंद करू. चालू देणार नाही. तुमची बदनामी करू, कोणालाही जिवंत सोडणार नाही, अशा धमक्या देत पुण्यातील दुग्ध व्यावसायिक चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून वीस लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडले. यात एका शिक्षिकेसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

पूनम सुनील परदेशी (वय २७, रा. १०१ घोरपडी गाव), सुनील बेनी परदेशी (वय ४९), करण सुनील परदेशी (वय २२) व अक्षय मनोज कार्तिक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कंपनीचे सहायक विपणन प्रतिनिधी नामदेव बाबूराव पवार (वय ६२) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींवर बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम परदेशी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका असून, तिचे वडील सुनील परदेशी आणि भाऊ करण परदेशी यांचा लॉंड्रीचा व्यवसाय आहे.

पूनम परदेशी यांनी २ जून रोजी दुग्ध व्यावसायिकाच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे दुधामध्ये भेसळ असल्याबाबत ई-मेलद्वारे तक्रार केली. त्यानंतर प्रत्यक्ष आणि दूरध्वनीद्वारे दुधामध्ये काळ्या रंगाच्या पदार्थ आढळून आला असल्याचे सांगून त्यांना वारंवार धमकी दिली. त्यानंतर ‘चितळें’नी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले.

युनिट १ च्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, अय्याज दडडीकर, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश वामगुडे व महिला पोलीस अंमलदार मीना पिंजण यांनी ही कारवाई केली.

चौकट

बनावट नोटांची दिली बंडले

गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने यांनी सापळा रचला. खंडणी म्हणून दोन हजारांच्या बनावट नोटा असलेले एकूण दहा बंडल असे वीस लाख रुपये आरोपींना देण्यात आले. ही रक्कम स्वीकारताना तिघांना रंगेहात पकडण्यात आले. तर त्यांचा चौथा साथीदार पूनमच्या बहिणीचा नवरा अक्षय मनोज कार्तिक याला मुंढव्यातील भारत फोर्जसमोरून ताब्यात घेण्यात आले. अक्षय कार्तिक याच्याविरुद्ध यापूर्वी वानवडी व मुंढवा पोलीस स्टेशन येथे सरकारी कामात अडथळा आणणे, दंगा, मारामारीचे तीन गुन्हे तर सुनील परदेशी याच्याविरुद्ध मुंढवा पोलीस स्टेशन येथे मारामारीचे दोन गुन्हे व करण परदेशी विरुद्ध मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे.

Web Title: Rs 20 lakh ransom demand from Chitale; Three arrested, including a teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.