पुण्यातल्या हॉटेल इंडस्ट्रीला दोन हजार कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:57+5:302021-06-27T04:08:57+5:30

आता वीकेंड घरातच : हॉटेलिंग राहणार बंद लक्ष्मण मोरे पुणे : राज्य शासनाने पुन्हा निर्बंध लागू करीत राज्यातील जिल्ह्यांची ...

Rs 2,000 crore hit Pune hotel industry | पुण्यातल्या हॉटेल इंडस्ट्रीला दोन हजार कोटींचा फटका

पुण्यातल्या हॉटेल इंडस्ट्रीला दोन हजार कोटींचा फटका

Next

आता वीकेंड घरातच : हॉटेलिंग राहणार बंद

लक्ष्मण मोरे

पुणे : राज्य शासनाने पुन्हा निर्बंध लागू करीत राज्यातील जिल्ह्यांची आणि शहरांच्या ‘लेव्हल’ची पुनर्रचना केली आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिकेनेही नवे निर्बंध लागू केले आहेत. सततच्या अशक्यतेमुळे व्यवसाय करायचा तरी कसा असा उद्विग्न सवाल हॉटेल व्यवसायिक करू लागले आहेत. या धरसोड धोरणामुळे मागील दीड वर्षात पुण्यातल्या हॉटेल इंडस्ट्रीला तब्बल दोन ते अडीच हजार कोटींचा फटका बसला आहे. या व्यवसायावर अवलंबून अन्य पूरक व्यवसायही धोक्यात आले आहेत.

मागील दीड वर्षात व्यवसाय, उद्योग, शिक्षण आदी कारणांकरिता पुण्यात परराज्यातून तसेच परदेशातून येणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी झाले आहे. हे ‘कॉर्पोरेट ट्रॅव्हलिंग’ कमी झाल्याने थ्री स्टार ते सेव्हन स्टार हॉटेल्सला मोठा फटका बसला आहे. या हॉटेल्समध्ये गुंतवणूक केलेल्या अनेक कंपन्या आणि गुंतवणूकदारांना आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. यासोबतच छोट्या हॉटेल-रेस्टॉरंट आणि बार व्यावसायिकांना पुन्हा उभारी घेण्यास मोठा कालावधी लागणार आहे.

राज्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे वीकेंड हॉटेलिंग पुन्हा बंद झाले आहे. तसेच सोमवार ते शुक्रवार नागरिक संध्याकाळनंतर बाहेर पडू शकणार नाहीत. पूर्वीप्रमाणे केवळ होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. हॉटेल्सच्या वेळा वाढवून देण्यात आल्याने हॉटेल चालक मालकांनी कामगार गावाहून बोलावून घेतले. अनेकांनी तर कामगारांना विमानाने तसेच रेल्वेने स्वखर्चाने आणले. आता पुन्हा त्यांना परत पाठविणे आणि पुन्हा बोलावणे परवडणारे नाही. कामगारांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण होणार आहे.

----

शहरातील एकूण हॉटेल्स - अंदाजे ३०००

हॉटेल्सवर अवलंबून असलेले कर्मचारी - साधरणपणे १ लाख

----

२) सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमता

हॉटेल्स सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुरू राहणार असून या काळात ५० टक्के क्षमतेने चार वाजेपर्यंत ती सुरू ठेवता येणार आहेत. त्यातच संचारबंदीमुळे नागरिक संध्याकाळी नागरिक बाहेर पडू शकणार नाहीत. केवळ पार्सल सुविधेवर व्यावसायिकांना समाधान मानावे लागणार आहे.

----

हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार?

“मोठ्या हॉटेल्सना लॉकडाऊन काळात मोठा आर्थिक फटका बसला आहे. वर्षभरात साधारण दोन ते अडीच हजार कोटींचे नुकसान झाले आहे. गुंतवणूकदारही बाधित झाले आहेत. हा व्यवसाय मुख्यत्वे संध्याकाळच्या वेळेवर अवलंबून आहे. कॉर्पोरेट ट्रॅव्हलिंगवर अवलंबून असलेला व्यवसाय बंदच आहे. शासन नागरिकांचा विचार करून नियम लावते. त्याचे पालनही आवश्यक आहे. एवढे नुकसान सहन केले तर आणखी थोडे नुकसान सहन करुया. पण, एकदाची ही महामारी जाऊ दे.”

- रणजित बत्रा, हॉटेल व्यावसायिक

---////---

“लॉकडाऊनचा विपरीत परिणाम झाला आहे. ती शासनाची अपरिहार्यता असली तरी हॉटेल व्यावसायिक मात्र रस्त्यावर यायची वेळ आली आहे. अनेकांनी कर्ज घेतली आहेत. वीज, पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच चालले आहेत. शासन अजूनही या व्यवसायाला ‘इंडस्ट्री’ मानायला तयार नाही. शासनाने या व्यवसायिकांना मदत करणे आवश्यक आहे.”

- अनिरुद्ध पाटील, हॉटेल व्यावसायिक

---///---

“हॉटेल व्यवसाय मुख्यत्वे संध्याकाळी होत असतो. समोवर ते शुक्रवार फारसे कोणी येत नाही. शनिवार रविवार बंद असल्याने आणखी नुकसान होते. अनेकदा अन्न फेकून द्यावे लागते. शासनाने या व्यवसायातली अनिश्चितता संपवणे आवश्यक आहे. हॉटेल्स दहा पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यास काहीच हरकत नाही. मागील वर्षभरात हॉटेल इंडस्ट्रीचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे.”

- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे हॉटेलियर्स असोसिएशन

Web Title: Rs 2,000 crore hit Pune hotel industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.