प्रशिक्षणावर २१ लाख रुपयांचा खर्च, अहमदाबाद येथील संस्थेवर मेहेरनजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 06:51 AM2017-10-07T06:51:15+5:302017-10-07T06:51:29+5:30
अहमदाबाद येथील एका संस्थेला दरमहा १ लाख ७५ हजार म्हणजे वार्षिक २१ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीकडे दिला आहे
पुणे : अहमदाबाद येथील एका संस्थेला दरमहा १ लाख ७५ हजार म्हणजे वार्षिक २१ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीकडे दिला आहे. त्याबदल्यात ही संस्था महापालिकेच्या विविध विभागांतील अभियंते, शहररचनाकार तसेच कंत्राटदारांनाही त्यांच्या कामाचे प्रशिक्षण देण्याचे काम करेल.
अहमदाबाद स्थित सेंटर फॉर एन्व्हायरनमेंट प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन या विभागाच्या वतीने हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पथ विभाग, बांधकाम विभाग, प्रकल्प विभागा, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काम करणारे अभियंते, शहरचनेशी संबंधित अभियंते, महापालिकेचे सल्लागार व कंत्राटदार यांनाही या संस्थेच्या वतीने त्यांच्या कामकाजासंबधीची आधुनिक माहिती दिली जाईल. त्याबाबतचे सर्व प्रशिक्षण ही संस्था वर्षभर त्यांना देईल.
त्याबदल्यात संबंधित संस्थेला दरमहा १ लाख ७५ हजार रुपये महापालिकेने द्यायचे आहेत. वार्षिक २१ लाख रुपयांचा खर्च करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीला दिला आहे. समितीच्या येत्या मंगळवारच्या सभेत त्यावर चर्चा होईल. समिती याबाबत काय निर्णय घेते, याविषयी अन्य नगरसेवकांमध्ये उत्सुकता आहे.