शंभर युनिटपेक्षाही कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकाला वीज बिलातील वाढ ३८ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 10:08 AM2023-04-05T10:08:20+5:302023-04-05T10:08:49+5:30

महिना पाचशे ते एक हजार युनिट वीज वापरणारे एकूण घरगुती ग्राहकांमध्ये केवळ एक टक्का

Rs 38 increase in electricity bill for customers consuming less than 100 units of electricity | शंभर युनिटपेक्षाही कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकाला वीज बिलातील वाढ ३८ रुपये

शंभर युनिटपेक्षाही कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकाला वीज बिलातील वाढ ३८ रुपये

googlenewsNext

पुणे : महिन्याला शंभर युनिट वीजवापर असणाऱ्या ग्राहकाला मार्चचे वीज बिल ७४३ रुपये आलेले असल्यास आणि एप्रिलमध्ये तेवढाच वापर झाल्यास बिल ७८१ रुपये येईल. अर्थात ग्राहकाला ३८ रुपये जास्त द्यावे लागतील. ज्याचा वापर शंभर युनिटपेक्षाही कमी आहे, त्याची वीज बिलातील वाढ ३८ रुपयांपेक्षा कमी असेल, असा दावा महावितरणने केला आहे.

महावितरणचे ६९ टक्के ग्राहक एका महिन्यात शंभर किंवा त्यापेक्षा कमी युनिट वीज वापरतात, असे स्पष्टीकरणही महावितरणकडून देण्यात आले आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणला नुकतीच दरवाढीस मान्यता दिली आहे. ही दरवाढ एक एप्रिलपासून लागू केली असून, आयोगाच्या निर्देशांनुसार यंदा ही दरवाढ २.९ टक्के तर पुढील वर्षी ५.६ टक्के असेल.

ज्या ग्राहकाचा वीजवापर महिना ३०० युनिट आहे, त्याला मार्चचे ३ हजार ९६ रुपये बिल होते. त्याला आता एप्रिलचे बिल ३ हजार २८९ रुपये द्यावे लागेल. त्यामुळे त्याच्या बिलात १९३ रुपयांची वाढ होणार आहे. याचाच अर्थ शंभर ते ३०० युनिट वीज दरमहा वापरणाऱ्यांचे बिल जास्तीत जास्त १९३ रुपयांनी वाढेल. अशा ग्राहकांचे प्रमाण २७ टक्के आहे.

पाचशे युनिट वीज वापरणारे मोठे ग्राहक तीन टक्के आहेत. त्यांचे मार्चचे बिल ६ हजार २९० रुपये होते. ते आता ४२८ रुपयांनी जास्त असेल. महिना पाचशे ते एक हजार युनिट वीज वापरणारे एकूण घरगुती ग्राहकांमध्ये केवळ एक टक्का आहेत. त्यांना सध्या महिन्याला १५ हजार ३१५ रुपये बिल येते. दरवाढीनंतर त्यात १ हजार ११२ रुपयांची वाढ होईल.

Web Title: Rs 38 increase in electricity bill for customers consuming less than 100 units of electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.