Pune: सावित्रीबाई फुले स्मारकाच्या भूसंपादनासाठी ४० कोटींची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:08 IST2025-02-11T13:07:14+5:302025-02-11T13:08:21+5:30

पुढील काही दिवसांमध्ये जागामालकांना नुकसान भरपाई देत स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी जागा ताब्यात घेतली जाणार

Rs 40 crore required for land acquisition for Savitribai Phule memorial | Pune: सावित्रीबाई फुले स्मारकाच्या भूसंपादनासाठी ४० कोटींची गरज

Pune: सावित्रीबाई फुले स्मारकाच्या भूसंपादनासाठी ४० कोटींची गरज

पुणे : महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी येथील जागा आरक्षित करण्यास व भूसंपादनास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावानुसार भूसंपादनासाठी ४० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे.

समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले आणि पहिली मुलींची शाळा सुरू करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे गंजपेठेतील फुलेवाडा येथे वास्तव्य होते. हा परिसर समता भूमी म्हणून ओळखला जातो. या परिसरातील फुले वाडा राज्य शासनाच्या हेरीटेज विभागाच्या ताब्यात आहे तसेच महापालिकेच्या वतीने याच परिसरात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक तयार करण्यात आले आहे. या स्मारकांना वर्षभर राष्ट्रीय नेते आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती भेटी देतात. समता भूमीचे विस्तारीकरण करण्याची आणि फुले वाडा-सावित्रीबाई फुले स्मारक जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक याच्यामध्ये अंदाजे शंभर मीटरचे अंतर आहे. मात्र, फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या आसपास झोपडपट्टी व दाट लोकवस्ती आहे. दोन्ही वास्तू जोडण्यासाठी या घरांचे स्थलांतर करून भूसंपादन करावे लागणार आहे. हे भूसंपादन करून देण्याचे काम महापालिकेला करावे लागणार आहे. हे भूसंपादन झाल्यानंतर दोन वास्तू जोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

गेल्या आठवड्यात फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. यासाठी २०० कोटींच्या निधीस आणि येथील रहिवाशांची पुनर्वसन मंजुरी दिली आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद केली जाणार आहे. या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागेचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना महापालिकेला केली होती.

त्यानुसार स्मारकासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात घेण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्याला मान्यता देण्यात आली. स्थायी समितीच्या मंजुरीमुळे या स्मारकाच्या कामाला वेग येणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये जागामालकांना नुकसान भरपाई देत स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी जागा ताब्यात घेतली जाईल, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Rs 40 crore required for land acquisition for Savitribai Phule memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.