पाणीपट्टीची ४६८ कोटींची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 03:52 AM2018-08-22T03:52:20+5:302018-08-22T03:52:39+5:30

थकबाकीदारांमध्ये औद्योगिक, व्यावसायिक सर्वाधिक; अनधिकृत कनेक्शनची संख्या दुप्पट

Rs 468 crore of water stock outstanding | पाणीपट्टीची ४६८ कोटींची थकबाकी

पाणीपट्टीची ४६८ कोटींची थकबाकी

Next

पुणे : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले उत्पन्न, उत्पन्नाचे स्रोत मात्र दिवसेंदिवस कमी होत आहेत. असे असताना शहरामध्ये पाणीपट्टीची थकबाकी तब्बल ४६८ कोटींच्या घरात गेली असल्याची माहिती समोर आली आहे. तर शहरात सध्या केवळ १ लाख ६० हजार अधिकृत नळ कनेक्शन असून, अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या दुप्पट म्हणजे तब्बल साडेतीन लाखांच्या घरात असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
शहरामध्ये आठ लाखांपेक्षा नोंदणीकृत प्रॉपर्टीधारक असताना केवळ १ लाख ६० हजार कुटुंबांकडे अधिकृत नळजोडणी आहे. याबाबत नगरसेवक विशाल तांबे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याची सद्य:स्थिती, एकूण थकबाकी व अधिकृत नळजोडणी संख्या याबाबत विचारलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना महापालिकेच्या वतीने ही माहिती देण्यात आली. यामध्ये सध्या शहरामध्ये घरगुती वापराचे सुमारे १ लाख २२ हजार अधिकृत नळ कनेक्शन आहेत, तर व्यावसायिक, औद्योगिक वापराचे सुमारे ३८ हजार नळ कनेक्शन आहेत. यामध्ये घरगुती वापर करत असलेल्या कुटुंबांकडे सुमारे १३७.५७ कोटी रुपयांची, तर औद्योगिक व व्यावसायिक वापर करत असलेल्याकडे तब्बल ३३०.१५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे प्रशासनाने लेखी दिले आहे.

शहरातील नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. थकबाकीदारांमध्ये दुबार पाणीपट्टी, नादुरुस्त मीटर, रस्ते दुरुस्ती, रुंदीकरणामध्ये बंद पडलेली नळ कनेक्शन असे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे थकबाकीदारांची संख्यादेखील वाढली आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी अनेक वेळा लोकअदालत भरविण्यात आली, परंतु यालादेखील खूप कमी प्रतिसाद मिळत आहे. यामुळे थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
- व्ही. जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख

Web Title: Rs 468 crore of water stock outstanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.