विक्रीकर निरीक्षक महिलेला ५ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:15 AM2021-03-09T04:15:05+5:302021-03-09T04:15:05+5:30
पुणे : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून विक्रीकर विभागातील निरीक्षक महिलेला परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने चोरट्याने ५ लाख रुपयांचा गंडा ...
पुणे : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून विक्रीकर विभागातील निरीक्षक महिलेला परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने चोरट्याने ५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला विक्री कर विभागात निरीक्षक आहेत. गेल्या वर्षी त्यांची सोशल मिडियावर सायबर चोरट्याची ओळख झाली होती. चोरट्याने परदेशात वास्तव्यास असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर त्यांच्यातील संवाद वाढला. चोरट्याने त्यांना परदेशातून कपडे तसेच चीजवस्तू पाठविण्याचे आमिष दाखविले होते. भेटवस्तू भारतात पाठविण्यात आल्याची बतावणी चोरट्याने केली. भेटवस्तू ताब्यात घेण्यासाठी काही रक्कम भरावी लागेल, अशी बतावणी चोरट्याकडून करण्यात आली होती. चोरट्याने महिलेला एका बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले होते.
महिलेकडे वेळोवेळी बतावणी करून चोरट्याने ५ लाख रुपये उकळले. दरम्यान, भेटवस्तू न मिळाल्याने महिलेला संशय आला. त्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली.