वडारवाडीतील जळीतग्रस्तांना सरकारची ५ हजार रुपये व कोरड्या शिध्याची तातडीची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:55 PM2020-03-26T18:55:04+5:302020-03-26T18:56:24+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
पुणे: वडारवाडी येथे काही दिवसांपूर्वी मोठी आग लागली होती. त्यात ५६ जणांच्या झोपड्या जळून खाक झाल्या होत्या.त्यात नुकसान झालेल्या जळीतग्रस्तांना तहसील कार्यालयाकडून ५ हजार रूपयांचा धनादेश व डाळ, तांदुळ देण्यात आले. पोलिसांच्या साह्याने ही मदत करण्यात आली.
या महिन्यातील १९ तारखेला वडारवाडी येथे मोठी आग लागली होती. त्यात ५६ जणांच्या झोपड्या जळून खाक झाल्या. त्या सर्व कुटुंबांची व्यवस्था गोखलेनगरमधील शाळेत करण्यात आली आहे. जवळचे सर्व काही जळून गेल्याने या कुटुंबांसमोर जगण्याचा काही पर्यायच शिल्लक नव्हता. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या मदतीवरच त्यांचे सगळे सुरू होते. कोरोना विषाणू आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जाहीर झाल्याने त्यांची मदतही थांबली
तहसीलदार तृप्ती कोलते यांनी त्यांची ही अडचण ओळखून नायब तहसीलदार व अन्य अधिकार्यांच्या मदतीने या सर्वांच्या जळीत झोपड्यांचे तातडीने पंचनामे केले. त्याचा प्रस्ताव तातडीने तयार करून तो मंजूर करून घेतला. या सर्व जळीतग्रस्तांना आज पोलिसांच्या मदतीने प्रत्येक कुटुंबाला ५ हजार रूपयांचा धनादेश तसेच डाळ, तांदुळ असा कोरडा शिधा ते राहत असलेल्या शाळेत जाऊन देण्यात आला.
कोलते म्हणाल्या, सर्व धनादेश स्टेट बँकेचे आहेत. बँकेचे कामकाज सुरू असल्याने हे धनादेश त्यांना लगेच खात्यात जमा करता येतील. त्यांना अन्य काय मदत करता येईल यावर विचार सुरू आहे, मात्र तातडीची मदत म्हणून हे करण्यात आले. सहकारी अधिकाऱ्यांनी त्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही वेळ न दवडता केली, त्यामुळे हे शक्य झाले.