‘प्लेबॉय’ रॉयल्टी प्रकरणी ५८ कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:31+5:302021-01-10T04:08:31+5:30
पुणे : प्लेबॉय युनिटच्या फ्रँचायजीची रॉयल्टी न देता हिंदी चित्रपट निर्मात्याची तब्बल ५८ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा ...
पुणे : प्लेबॉय युनिटच्या फ्रँचायजीची रॉयल्टी न देता हिंदी चित्रपट निर्मात्याची तब्बल ५८ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सचिन जगदीशप्रसाद जोशी (रा. हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई) इतर संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी चित्रपट निर्माते पराग मधू संघवी (वय ४८, रा. अंधेरी) यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१६ ते जानेवारी २०२१ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग संघवी हे हिंदी चित्रपट निर्माते आहेत. प्लेबॉय या अमेरिकी कंपनीचे भारतातील सर्वाधिकार संघवी यांच्याकडे होते. जून २०१६ मध्ये संघवी यांच्या कंपनीत सचिन जोशी यांनी गुंतवणूक केली. त्यांच्याबरोबर भारतभर असणाऱ्या प्लेबॉय युनिट येथे सचिन जोशी यांच्यासह वायकिंग मीडिया ॲन्ड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे अन्य संचालक यांनी संघवी यांच्याशी सामंजस्य करार केला. पुण्यात बाणेर व कोरेगाव पार्क येथे प्लेबॉय बिअर गार्डन आऊटलेट हे दुकान तसेच भारतभर दुकाने सुरु केली.
संघवी यांच्याबरोबर केलेल्या करारानुसार त्यांना फ्रँचायजीने कंपनीच्या बोधचिन्हाचा वापर केला. मात्र, आरोपींनी २०१६ पासून त्यांना देणे असलेली रॉयल्टी दिली नाही. खोटी कागदपत्रे बनवून संघवी यांच्या कंपनीचे ५० कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केली, अशी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक एच. एम. ननावरे अधिक तपास करीत आहेत. संघवी यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौकशी करुन गुन्हा दाखल केला असल्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.