"रोज एक नवीन प्रकरण काढणं चालणार नाही"; प्रार्थनास्थळांवरील दाव्यांवर मोहन भागवतांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 10:06 IST2024-12-20T09:37:40+5:302024-12-20T10:06:00+5:30
राम मंदिरासारखं आंदोलन पुन्हा करुन नेता होता येत नाही असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.

"रोज एक नवीन प्रकरण काढणं चालणार नाही"; प्रार्थनास्थळांवरील दाव्यांवर मोहन भागवतांचे विधान
Mohan Bhagwat: सध्या देशात सुरु असलेल्या हिंदू मंदिरांबाबतच्या वादावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महत्त्वाचे विधान केलं आहे. कोणत्याही प्रार्थनास्थळांखाली हिंदू मंदिरे असण्याचा दावा करणे अस्विकारहार्य असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. वेगवेगळ्या धर्मियांना आणि विचारधारांना सलोख्याने भारतात राहण्यासाठी योग्य वातावरण निर्माण व्हावं अशी अपेक्षा मोहन भागवत यांनी व्यक्त केली. सरसंघचालक मोहन भागवत हे पुण्यात सुरू असलेल्या एका व्याख्यानमालेत बोलत होते.
भारत विश्व गुरु झाला पाहिजे असं प्रत्येक भारतीयाला वाटतं. भारत विश्वगुरु झाला तर ठेकेदारी बंद होईल. कारण भारताची निर्मितीच परोपकारासाठी झाली आहे असं मोहन भागवत यांनी सांगितले. आगामी वीस एक वर्षात भारत विश्वगुरु होईल, अस मतही त्यांनी व्यक्त केलं. अयोध्येत राम मंदिर व्हावं असं हिंदूंना वाटायचं, त्याप्रमाणे राम मंदिर पूर्णही झालं. मात्र राम मंदिरासारखं आंदोलन पुन्हा करुन नेता होता येत नाही असंही त्यांनी बजावलं आहे. राम मंदिरासारखी आंदोलने अन्य प्रार्थनास्थळी करणे योग्य नाहीये, असेही मोहन भागवत म्हणाले.
देशात अल्पसंख्याक किंवा बहुसंख्य असं काही नाही, सर्वांना त्यांच्या इच्छेनुसार पूजा प्रार्थना करण्याची संधी मिळायला हवी असे मोहन भागवत म्हणाले.
"आपल्या देशाचे संविधान आहे. त्यातील काही भाग संसद बदलते. कायदे बदलतात, नियम बदलतात. पण चार गोष्टी न बदलणाऱ्या आहेतय संविधानाची प्रस्तावना, संविधानातली मार्गदर्शक तत्वे, संविधानातील नागरिकांची कर्तव्य, नागरिकांचे अधिकार या चार गोष्टी कुठल्या आहेत याचं आपल्या घरी प्रबोधन झालं पाहिजे आणि श्रद्धापूर्वक त्याचे आचरण जीवनात केले पाहिजे," असं मोहन भागवत यांनी म्हटलं.
"भारत विश्वगुरू व्हायला फार वेळ लागणार नाही. वीसएक वर्षात आपण ते स्थान गाठू शकू. राम मंदिर झालं पाहिजे ते होत आहे. हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे ते वाटतं. परंतु असं केलं म्हणजे हिंदूंमध्ये नेता होता येत नाही. अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशय याच्या पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसे चालणार. हे नाही चालणार. आपला देश आता संविधानानुसार चालतो. जनता आपली प्रतिनिधी निवडून देते. जे निवडून येतात ते राज्य चालवतात. राज्य जनतेचे असते," असंही मोहन भागवत म्हणाले.
"विश्वशांतीची घोषणा करून विश्वशांतीची आम्हाला शिकवण देऊन जगात वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न होत आहे. ज्यांना चांगले व्हायचे असते ते दिखावा न करता चांगले होतात. बाहेरून आलेल्यांनी देशावर राज्य केले. त्यातून आपण आपला इतिहास विसरलो. अशा वेळी आता आपण वाचले पाहिजे, शिकले पाहिजे. त्यामुळे आपली ताकद दाखवण्याची, आपली शस्त्र दाखवण्याची गरज आहे," असं मोहन भागवत म्हणाले.