पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना आरएसएसचे धडे ?विद्यार्थी संघटनांकडून विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 07:33 PM2020-02-13T19:33:09+5:302020-02-13T20:52:11+5:30

विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा

RSS lessons to Ranade students? Opposition from student organizations | पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना आरएसएसचे धडे ?विद्यार्थी संघटनांकडून विरोध 

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना आरएसएसचे धडे ?विद्यार्थी संघटनांकडून विरोध 

googlenewsNext
ठळक मुद्देपत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘नोईंग आरएसएस ’ कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाने रद्द केले व्याख्यान

पुणे: पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विश्व संवाद केंद्रातर्फे ‘नोईंग आरएसएस ’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या (रानडे इन्स्टिट्यूट) विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उपस्थित रहावे,अशा सूचना विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. मात्र, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता आरएसएसचे धडे दिले जाणार आहेत का? असा सवाल उपस्थित केला असून विभागाने या कार्यशाळेस विद्यार्थ्यांना पाठवू नये,अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.
       विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्यासाठीचे वेळापत्रक तयार केले जाते.या वेळापत्रकात शनिवार पेठ येथील ‘मोतीबाग’ या आरएसएसच्या कार्यालयात येत्या 15 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या कार्यशाळेची माहिती देण्यात आली आहे. बीएमसीसीचे माजी प्राचार्य व आरएसएसचे ऑल इंडिया संपर्क प्रमुख प्रा. अनिरूध्द देशमुख या कार्यशाळेत पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती  रानडेच्या विद्यार्थ्यांना विभागातर्फे देण्यात आली. मात्र, संभाजी ब्रिगेडसह नॅशनल स्टुडेंट युनियन ऑफ इंडिया (एनएसयुआय), स्टुडेंट हेल्पिंग हॅण्ड संघटनेने अशा प्रकारच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पाठवू नये,अशी भूमिका घेतली आहे.
विश्व संवाद केंद्राने रानडे इन्स्टिट्यूटकडे पत्रव्यवहार केला होता.तसेच आपले विद्यार्थी या कार्यशाळेसाठी पाठवावे, असे आवाहन केले होते. त्यावर विभागातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना याबाबत कल्पना दिली. तसेच चौथ्या सत्राच्या अभ्यासक्रमातही याचा समावेश आहे,असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. परंतु,राज्याच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी हे शिबिर तात्काळ रद्द करावे. अन्यथा विद्यापीठाने सर्व विचारधारेच्या संस्था-संघटनांचे मार्गदर्शन शिबीर ठेवावे.तसेच महाराष्ट्रात पुरोगामी विचारधारेचे सरकार असताना विद्यापीठाकडून या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी परवानगी कशी दिले जाते? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी उपस्थित केला आहे.तसेच विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला जाण्याविषयी सूचना देणा-या प्राध्यापकांवर कारवाई करावी,अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
---------------------------------
अशैक्षणिक कार्यक्रमांत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे योग्य नाही. त्यामुळे सदर कार्यक्रम तात्काळ रद्द करावा. तसेच याबाबतचे लेखी स्पष्टकरण विद्यापीठाने द्यावे,अन्यथा रानडे इन्स्टिट्यूटला टाळे ठोकले जाईल, असे निवेदन एनएसयुआयचे अध्यक्ष सतीश पवार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दिले आहे. तसेच या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्याच्या सूचना देणा-या प्राध्यापकांवर कारवाई करावी,अशीही मागणी केली आहे.
.........

विद्यार्थ्यांना शहरातील विविध कार्यक्रमांंची माहिती देण्यासाठी आठवड्याचे वेळापत्रक प्रसिध्द केले जातात. त्यात या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.परंतु, हा कार्यक्रम कोणत्याही विद्यार्थ्याला सक्तिचा केला नाही.परंतु,याबाबत कोणाचा आक्षेप असेल तर वेळापत्रकातून हा कार्यक्रम तात्काळ काढून टाकला जाईल.
- डॉ.उज्ज्वला बर्वे ,विभाग प्रमुख, रानडे इन्स्टिट्यूट ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

................................................................................

विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातून आरएसएसचा इतिहास वगळण्यात यावा.अभ्यासक्रमात समावेश करायचा असेल तर मार्क्सवाद ,आंबेडकरवाद, समाजवादाचा समावेश करावा.विद्यापीठाला आरएसएसचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगून काय सिध्द करायचे आहे. 
- कुलदीप आंबेकर,अध्यक्ष,स्टुडेंट हेल्पिंग हँड,

.............

विद्यापीठाने रद्द केले व्याख्यान
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘संज्ञापन व वृत्तपत्रविद्या’ विभागाच्या वतीने एमजेएमसी हा अभ्यासक्रम चालवला जातो. त्याअंतर्गत ‘वर्ल्ड व्ह्यू’ हा विषय शिकवला जातो. विद्यार्थ्यांना विविध विचारप्रवाहांची माहिती व्हावी व त्यांना सभोवतालचे योग्य प्रकारे आकलन व्हावे, या हेतूने विविध संघटनांची ओळख करून दिली जाते. या विषयात सर्वच विचारधारा व संघटनाच्या परिचयाचा समावेश आहे. ही व्याख्याने विविध ठिकाणी आयोजित केली जातात. त्याचाच भाग म्हणून शनिवार पेठेतील मोतीबाग येथे विद्यार्थ्यांसाठी ‘नोईंग आरएसएस’ या व्याख्यानाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, या व्याख्यानास काही संघटनांनी विरोध दर्शवल्याने शनिवारचे हे व्याख्यान रद्द करण्यात आले आहे. यापुढे विविध संघटनांची माहिती देणारी व्याख्याने विभागातच होतील, असा निर्णय विद्यापीठाने घेतला असल्याचे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: RSS lessons to Ranade students? Opposition from student organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.