संघाची पुण्यात बैठक, ३६ अखिल भारतीय संस्थांच्या २६६ प्रतिनिधींना सरसंघचालकांचे मार्गदर्शन
By राजू इनामदार | Published: September 13, 2023 04:38 PM2023-09-13T16:38:20+5:302023-09-13T16:42:53+5:30
संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती दिली...
पुणे :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ३६ अखिल भारतीय संस्थांच्या प्रतिनिधींची तीन दिवसांच्या संयुक्त बैठकीला पुण्यात आज (गुरूवार) पासून सुरूवात होत आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत या बैठकीला उपस्थित असतील. विश्व हिंदू परिषद पासून ते वनवासी कल्याण आश्रम, भारतीय मजदूर संघ आदीं संघाशी संबंधित संस्थांचा यात समावेश आहे.
संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती दिली. पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पश्चिम महाराष्ट्र सहप्रांत प्रचारक अतुल अग्निहोत्री यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने पत्रकारांनी आंबेकर यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या अनुषंगाने प्रश्नांचा भडिमार केला. काय चर्चा होणार ? भाजपचे कोण नेते येणार? निर्णय काय होतील? राम मंदिराचा विषय बैठकीत असेल का? असे अनेक प्रश्न विचारले जात असताना जांभेकर यांनी ते शांतपणे टोलवून लावले. भाजपचे कोण नेते येतील माहिती नाही. तुम्ही कोणाला व्हीआयपी म्हणता माहीत नाही, आमच्यासाठी प्रत्येकजण स्वयंसेवकच असतो, बैठका अंतर्गत चर्चेसाठी आहेत, त्यात कोणताही निर्णय होणार नाही. या चर्चेच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकारिणीच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊन ते जाहीर केले जातील असे आंबेकर यांनी सांगितले. प्रत्येक संघटनेला सामाजिक काम करताना त्यांचे म्हणून काही प्रश्न, अडचणी असतात, दुसऱ्या संघटनांना ही त्यांच्या काही अडचणी असतात, यावर संयुक्त चर्चा व्हावी, मार्ग निघावीत यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा बैठका होत असतात, अशी माहिती आंबेकर यांनी दिली.
सरसंघचालक डॉ. भागवत या बैठकीत मार्गदर्शन करतील. संघाचे डॉ. होसबाळे व अन्य अखिल भारतीय स्तरावरील वरिष्ठ ही बैठकीत असतील, माध्यम प्रतिनिधींना तिथे प्रवेश नाही, असे यावेेळी सांगण्यात आले.