आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:11 AM2021-02-24T04:11:54+5:302021-02-24T04:11:54+5:30
पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील ९ हजार ...
पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील ९ हजार ३९३ शाळांमधील ९६ हजार ३८८ जागांच्या प्रवेशाचे वेळापत्रक येत्या दोन ते तीन दिवसांत प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र तयार ठेवावीत, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यातही शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आरटीई प्रवेशाच्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित होते. यंदा कोरोनामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी आरटीईच्या प्रवेश क्षमतेत घट झाल्याचे दिसून येत आहे. सध्या ९ हजार ३९३ शाळांनी नोंदणी केली असली तरी सुमारे ५० शाळांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. त्यामुळे आरटीईच्या एकूण जागांमध्ये वाढ होऊ शकते.
राज्यात आरटीईचे सर्वाधिक प्रवेश पुणे जिल्ह्यात होतात. मागील वर्षी जिल्ह्यात आरटीईच्या १६ हजार ९५० जागांवर उपलब्ध होत्या. यंदा जिल्ह्यातील जागांची संख्या १४ हजार ५२३ झाली आहे. त्यामुळे यंदा आरटीई प्रवेश क्षमतेत घट झाली आहे. जिल्ह्यातील ९६९ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करून पूर्ण करावी, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
--
आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू असून ऑनलाइन अर्ज भरून त्याची चाचणी घेतली जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
- दिनकर टेमकर, सहसंचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य