आरटीईच्या जागा रिक्तच
By admin | Published: April 25, 2015 05:05 AM2015-04-25T05:05:50+5:302015-04-25T05:05:50+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागा भरण्यात अनेक शाळांमध्ये उदासीनता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागा भरण्यात अनेक शाळांमध्ये उदासीनता असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुर्व प्राथमिक व पहिलीमधील एकुण १३ हजार ४८४ जागांपैकी अद्याप ११ हजार ३८० जागा रिक्त आहेत. आरटीईअंतर्गत पुर्व प्राथमिक की पहिलीपासून प्रवेश द्यायचे याबाबत असलेला गोंधळ तसेच शुल्क परताव्यावरून अनेक शाळांना प्रवेश देण्यास नकार दिल्याने ही स्थिती उदभवली आहे.
आरटीईनुसार शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पुणे पालिका क्षेत्रातील २१४, पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्रातील १२५ आणि हवेली तालुक्यातील १०८ अशा एकुण ४४७ शाळा यासाठी पात्र आहेत. त्यामध्ये पुर्व प्राथमिकसाठी एकुण ५ हजार २०० तर पहिलीसाठी ८ हजार २८४ प्रवेश क्षमता आहे. मात्र बुधवार दि. २२ एप्रिलपर्यंत केवळ १५ टक्के जागांवरच प्रवेश झाले आहेत. सद्यस्थितीत आरटीई प्रवेशावरून शाळांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. कायद्यानुसार वय वर्षे ६ च्यापुढील म्हणजे पहिलीमध्ये आरक्षित जागा ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार ‘एन्ट्री पॉईंट’ म्हणजे पुर्व प्राथमिक किंवा पहिलीपासून प्रवेश करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात शिक्षण संचालकांनी दिलेल्या आदेशानुसार पुर्वलक्षी प्रभावाने पहिलीमध्ये प्रवेश करण्यास सांगण्यात आले आहे. या आदेशामुळे शाळांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ज्या शाळांनी एन्ट्री पॉईंट पुर्व प्राथमिक म्हणून प्रवेश दिले आहेत, त्या शाळांनी आता पुन्हा पहिलीमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी पात्र ठरूनही मुलांना प्रवेश मिळत नाहीत. त्यामुळे हजारो जागा रिक्त राहिल्या आहेत. (प्रतिनिधी)