आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेचा वाचविला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 07:58 PM2019-04-30T19:58:01+5:302019-04-30T19:58:52+5:30
होळकर पुलाच्या ज्ञानेश्वर घाटाकडे एक महिला आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे खडकी पोलीस ठाण्याच्या मार्शलला आढळून आले़.
पुणे : महिला आत्महत्या करण्याच्या तयारी असलेल्याबद्दल पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर पोलीस हवालदार राजू मोहिते यांनी संबंधितांना त्याची माहिती घेऊन शोध घेण्यास सांगितले़. त्यानंतर काहीच मिनिटात होळकर पुलाच्या ज्ञानेश्वर घाटाकडे एक महिला आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे खडकी पोलीस ठाण्याच्या मार्शलला आढळून आले़. त्यांनी त्या महिलाला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले़. ३१ जानेवारी २०१९ रोजी घडलेल्या या घटनेबद्दल क्रिएटिव्ह वूमन ग्रुपच्या प्राची दासवानी यांनी पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम व पोलीस मार्शल राजू मोहिते यांचे अभिनंदन करुन त्यांना प्रशस्तीपत्र दिले़.
पोलीस नियंत्रण कक्षाला ३१ जानेवारीच्या सायंकाळी एका महिलेचा फोन आला़. त्यात तिने सांगितले की, त्यांच्या व्हाटसअप ग्रुपवर एक मेसेज आला आहे़. त्यात एक अनोळखी महिला ही औंध परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत आहे़. ही माहिती मिळाल्यावर नियंत्रण कक्षाच्या उपनिरीक्षक सोनवणे यांनी मार्शल राजू मोहिते यांना कळविले़. मोहिते यांनी औंध परिसरातील नदीचे सर्व पुल तपासले़. पण अशी कोणतीही महिला आढळली नाही़. दुसºया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना असेल असे त्यांना वाटल्याने त्यांनी खडकी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यांना वायरलेसवरुन कॉल करुन शोध घेण्यास सांगितले़. मरीआई मार्शल आबनावे व म्हस्के यांनी होळकर पुलावर पाहणी केली़ तेव्हा एक महिला ज्ञानेश्वर घाटाकडे जाताना त्यांना दिसली़. त्यांनी तिला आत्महत्येपासून परावृत्त करुन खडकी पोलीस ठाण्यास घेऊन गेले़ त्या ठिकाणी तिला नातेवाईकांच्या ताब्यात दिले़
व्हीएचएफचे हवालदार धर्मराज मोहिते, मरीआई मार्शलवरील कर्मचारी नाईक आबनावे, शिपाई म्हस्के यांनी प्रसंगावधान दाखवून कर्तव्यावर दाखविलेले सतर्कतेमुळे एका महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करुन तिचा जीव वाचविला.
या कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल क्रिएटिव्ह वूमन ग्रुपच्या प्राची दासवानी, त्यांचे पती व पाच वर्षांची मुलगी मिशिका दासवानी यांनी पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम यांची भेट घेऊन पोलिसांचे अभिनंदन करुन त्यांना प्रशस्तीपत्रक दिले.